मनरेगा कामांमध्ये ‘हा’ जिल्हा राज्यात दुसरा; विकासकामांसह रोजगारनिर्मितीला पण मिळाली चालना

MGNREGA

अमरावती : कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असताना ग्रामीण नागरिकांना मनरेगातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार आजमितीला जिल्ह्यात 690 गावांतून 3 हजार 120 विविध कामे सुरू असून, 86 हजार 993 मनुष्यबळ रोजगारनिर्मिती झाली आहे. मनरेगा कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे.

ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी मनरेगातून अधिकाधिक कामे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी वेळोवेळी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात रोजगारनिर्मितीत भरीव वाढ झाली आहे. राज्यात आजमितीला मनरेगा कामांमध्ये भंडारा जिल्ह्यात 1 लाख 23 हजार 307 मनुष्यबळ उपस्थिती असून हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यातही गत महिनाभरात रोजगारनिर्मितीत लक्षणीय वाढ झाली आहे. सुमारे 86 हजार 993 मनुष्यबळ रोजगारनिर्मिती झाली आहे. कोरोना संकटकाळात लॉकडाऊन असताना ग्रामीण भागातील नागरिक रोजगारापासून वंचित राहू नयेत म्हणून मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामांना चालना देण्यात येत आहेत, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी दिली.

ग्रामीण भागात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील मेळघाटातील अतिदुर्गम परिसरात या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन कुणीही रोजगारापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व प्रशासनाने विविध कामांना तत्काळ प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्याची प्रक्रिया पार पडली. कामावर असलेल्या प्रत्येकाला 15 दिवसाच्या आत त्यांची मजुरी थेट बँक किंवा पोस्ट खात्यात जमा करण्यात येत आहे. मजुरांची उपस्थिती सातत्याने वाढत असून त्याप्रमाणे विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे, असेही लंके म्हणाले.

मनरेगाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ देण्याचा संकल्प असल्यामुळे तात्काळ कामे सुरु करण्यात आली आहेत. नागरिकांना कामासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता पडू नये. स्थलांतर थांबवणे आवश्यक आहे. मेळघाटात अधिकाधिक रोजगारनिर्मितीला प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आजमितीला चिखलदरा तालुक्यात सुमारे 40 हजार 145, तर धारणी तालुक्यात सुमारे 27 हजार 125 मजूर उपस्थिती आहे. मनरेगाच्या माध्यमातून तीन हजारावर विविध विकासकामांना चालना मिळाली आहे. या दृष्टीने इतरही ठिकाणी कामे राबविण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, कामांवर मास्क, सॅनिटायझरचा वापर करून व सोशल डिस्टन्सिंग आदी दक्षता घेण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

थेट ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागात उपजीविकेचा प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वरदान ठरली आहे. रोजगार हमीच्या कामांवरील मजुरीतही वाढ करण्यात आली आहे. प्रतिदिन 238 रुपये याप्रमाणे किमान मजूरी देण्यात येते. ग्रामीण भागातील नागरिकांनी मनरेगाअंतर्गत कामांना सुरुवात करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कोरोनामुळे ड्रायफ्रूटसची आयात बंद काजू, बदाम, बेदाणे झाले स्वस्त

एसबीआयच्या नफ्यात झाली इतक्या कोटींची वाढ

फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन