यंदा गोदावरी नदीच्या घाटावर दुर्गादेवी मुर्ती विसर्जनासाठी प्रशासनाकडून बंदी

nanded

नांदेड : महापालिकेच्या वतीने झरी, पासदगाव, गाडेगाव या तीन ठिकाणी दुर्गादेवी मुर्ती विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी मुर्तीचे नदी घाटावर विसर्जन न करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  नांदेड महापालिकेच्या वतीने १४ ऑक्टोंबर रोजी उपआयुक्त शुभम क्यातमवार यांनी श्री दुर्गादेवी विसर्जनाच्या नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत उपआयुक्त यांनी महापालिकेच्या वतीने झरी, पासदगाव, गाडेगाव या तीन ठिकाणी देवी विसर्जनाची व्यवस्था केली असल्याची माहिती दिली. गोदावरी नदी घाटावर मुर्ती विसर्जनासाठी प्रतिबंधित करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. निर्माल्य संकलनासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात वाहानाच्या व्यवस्थेबाबत त्यांनी माहिती घेतली. क्षेत्रीय अधिकारी व स्वच्छता निरिक्षकांनी आपल्या क्षेत्रातील देवीच्या मंडळाना भेट देऊन झरी, पासदगाव, गाडेगाव या तीन ठिकाणी दुर्गा देवी विसर्जन करण्यात येणार असल्याबाबत महिती द्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

विसर्जनाच्या ठिकाणी दोन सत्रामध्ये कर्मचारी नियुक्त करण्याबाबत सुचना देण्यात आल्या. झरी खदानाच्या ठिकाणी क्रेनची व्यवस्था करण्यात यावी, अशी सुचना दिली. मंडळांनी वरील ठिकाणीच देवी विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. गोदावरी नदी पात्रात मुर्ती विसर्जन करु नये महापालिकेला सहकार्य करावे, कोरोना नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीस सहा.आयुक्त गुलाम सादेक, क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव, डॉ. रईसोद्दीन, अविनाश अटकोरे, रमेश चवरे यांच्यासह स्वच्छता विभाग, विद्युत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या