‘यंदा रायगडावर साधेपणाने साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा’

shivrajyabhishek-sohala

मुंबई : दरवर्षी अखिल भारतीय राज्याभिषेक समितीच्या वतीने दरवर्षी सहा जूनला दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. या निमित्ताने देशभरातून हजारो शिवभक्त रायगडावर हजेरी लावतात. समितीचे मार्गदर्शक व शिवछत्रपतींचे वंशज श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ‘कोरोना महामारीचे संकट पाहता समाजहीत डोळ्यासमोर ठेवून शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्याचे नियोजन केले आहे. सोहळा साधेपणाने साजरा होईल’, असे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

तसेच यावर्षीचा शिवराज्याभिषेक घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. स्वराज्याचे प्रतिक भगवा ध्वज घरासमोर लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करु नये, अशी विनंती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यावर सध्या कोरोनाचं संकट आहे‌. अशा परिस्थितीत लाखोंच्या संख्येने रायगडवर जाणं योग्य नाही. महाराज प्रजादक्ष होते म्हणून आज साडेतीनशे वर्षांनंतरही महाराज मनामनात आहे. आपण महाराजांचे मावळे असल्याने आपल्यावर आणखी जबाबदारी असल्याचं संभाजी महाराजांनी सांगितलं आहे.