कोरोनाच्या संकटात सेनेचा ‘हा’ युवा खासदार ठरतोय ‘देवदूत’

ठाणे : राज्यासह ठाणे जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांचा तसेच कोरोना बाधित नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा आकडा वाढतच चालला आहे. या कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता प्रत्येकजण युद्ध पातळीवर कार्यरत आहे आणि राज्य सरकार वेळोवेळी अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवत आहेत.

या उपाययोजना राबवत असताना सरकारी तिजोरीवर त्याचा खूप मोठा ताण पडत आहे. शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गाला खायची भ्रांत पडत आहे. यासाठी हातभार म्हणून खारीचा वाटा उचलत कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने जवळपास १० हजाराहून अधिक कामगार कुटुंबांसाठी मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. घरोघरी जाऊन त्या साहित्याचे वाटप केले जात आहे. यापूर्वी देखील पोलीस, कामगार, इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, बेघर यांना दोन वेळ जेवणाचे पाकीट ते मतदारसंघात वाटत आहेतच.

तसेच कोरोनाविरोधातील लढण्याकरिता त्यांनी खासदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केला आहे. एवढ्यावरच न थांबता आपल्या एका महिन्याचे वेतन देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले आहे..

फक्त समाजकारण हे तत्त्व घेऊन राजकारणात वाटचाल करणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून खासदार श्रीकांत शिंदे आपले मार्गक्रमण करत आहेत. महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती वेळी दोन्ही पिता पुत्रांनी दाखवलेली तत्परता व समाजाच्या सेवेची अखंड परंपरा या संकटात देखील अबाधित आहे.