राष्ट्रवादीला धक्का : ‘हा’ जिल्हाध्यक्ष हाती शिवबंधन बांधण्याच्या तयारीत ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. तसेच निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करत आहेत.

पक्षांतर करणाऱ्यांच्या यादीत आता सोलापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो. दीपक साळुंखे सांगोला विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. साळुंखे हे शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

दीपक साळुंखे हे सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आले होते. परंतू २०१६ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनी साळुंखे यांचा पराभव केला होता. तसेच साळुंखे हे सांगोला सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या कारखान्याच्या चौकशीचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत.

दरम्यान, आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील चित्रा वाघ, सचिन आहिर, धनंजय महाडिक, वैभव पिचड, याच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच रश्मी बागल आणि दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे दीपक साळुंखे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला अजून एक धक्का बसू शकतो.