fbpx

हे राष्ट्र केवळ भारतीय राज्यघटनेमुळे धर्मनिरपेक्ष -असदुद्दिन ओवेसी 

पुणे -भारत हे हिंदुंमुळे नव्हे, तर केवळ भारतीय राज्यघटनेमुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि राज्ययंत्रणेने कोणत्याही धर्माची बाजू न घेता निरपेक्ष असले पाहिजे, असे मत मजलिस ए इत्तेहदुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी व्यक्त केले. ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.

पुण्यातील साहित्य आणि कला क्षेत्रातील जाणकार असलेल्या वर्षा चोरडिया आणि सबिना संघवी यांच्या पुढाकाराने सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे. डब्लू मॅरिएट येथे ‘वर्डस् काउंट’ या शब्दोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वर्डस् काउंट’ या शब्दोत्सवाची संकल्पना ही सुप्रसिद्ध पुरस्कार्थी लेखिका, पटकथाकार आणि स्तंभलेखिका अद्वैता कला यांची असून, शब्दोत्सवाची ही दुसरी आवृती आहे.

प्रफुल्ल केतकर यांनी, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, मुस्लीम धार्मिक तत्वज्ञान आणि भारतीय राज्यघटना, डॉ. आंबेडकर यांची मते, यांविषयी असदुद्दिन ओवेसी यांना प्रश्न विचारले.

असदुद्दिन ओवेसी म्हणाले, “भारताच्या राज्यघटनेतील अनेक कलमांमध्ये धर्मनिरपेक्षता दिसते. घटनेच्या सरनाम्यात विविधता आहे. त्याशिवाय धर्मनिरपेक्षता येऊ शकत नाही. भारतात धर्मनिरपेक्षता आहे कारण, भारताची घटना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना वाटते, तसे हे राष्ट्र हिंदुंमुळे नव्हे, तर केवळ आणि केवळ घटनेमुळेच धर्मनिरपेक्ष राहिली आहे.”

शबरीमाला, त्रिवार तलाक यांचे संदर्भ देऊन असदुद्दिन म्हणाले, की ‘तुमच्या श्रद्धेपेक्षा माझी श्रद्धा मोठी’, ही भूमिका चालणार नाही. राज्ययंत्रणेने कोणत्याही धर्माला पाठींबा देता कामा नये, तर निरपेक्षच असले पाहिजे. धर्माच्या नावावर कोणाचाही भेदभाव करू नये. भारत हे बहुविध संस्कृती आणि बहुविध धर्म, पंथ असलेले राष्ट्र आहे. प्रत्येकाच्या वेगवगेळ्या प्रथा, परंपरा आहेत. त्यामुळे सामान नागरी कायदा आणणे शक्य नाही.

मुस्लीम धार्मिक तत्त्वज्ञान आणि घटना या विषयावर बोलताना, ते म्हणाले, “मी भारतीय मुसलमान असून, त्याचा मला अभिमान आहे. ‘एआयएमआय’चा राज्यघटनेवर विश्वास आहे. शरिया मध्ये केवळ लग्न आणि घटस्फोट यांसारख्या कौटुंबिक विषयावर निर्णय घेतले जातात आणि ते मान्य नसतील तर न्यायालयात जाता येते. पण या गोष्टींचा खूप बाऊ केला जातो. ते म्हणाले, की बुरख्याबद्दल बोलले जाते, पण आपण घुंगटवर बोलतो का? खरे तर महिलांना, हवे तसे कपडे घालता आले पाहिजे.

सध्याच्या भारतीय राजकीय स्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले, “सध्या कोण जास्त हिंदू आहे, हे दाखविण्याची नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये स्पर्धा चालली आहे. या दोनही पक्षांमध्ये काही फरक नाही. शेतकरी, बेरोजगारी, दलित आदिवासी यांचे प्रश्न वाढत आहेत. मात्र कायद्याची निवडकपणे अंमलबजावणी केली जात असून, सोयीस्करपणे काहीच व्यक्तींवरचे गुन्हे माघारी घेतले जात आहेत.”