‘हे आंदोलन राजकीय नाही’; आंदोलनात घुसणाऱ्या कॉंग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता

‘हे आंदोलन राजकीय नाही’; आंदोलनात घुसणाऱ्या कॉंग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता

congress

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन हे सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज (सोमवारी) शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे.

दरम्यान आता या शेतकऱ्यांच्या या आंदोलनात घुसून आपला हेतू साध्य करू पाहणाऱ्या राजकीय नेत्यांपासून शेतकरी आंदोलकांनी दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा प्रत्यय आज दिल्लीमध्ये आंदोलनस्थळी पाहायला मिळाला आहे. नेमके घडले असे कि दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी शेतकरी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी थेट गाझीपूर सीमेवर पोहचले. परंतु, आंदोलकांनी मात्र ‘हे राजकीय आंदोलन नसल्याचं’ सांगत चौधरी यांना घरचा रस्ता दाखवला आहे.

यावर माध्यमांशी बोलताना अनिल चौधरी म्हणाले कि, ‘मी शेतकरी आंदोलकांची परिस्थिती समजू शकतो. हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. शेतकऱ्यांना वाटत असेल की आम्ही इथून निघून जावं, तर आम्ही परत जाऊ. आम्ही इथं फक्त शेतकऱ्यांसाठी आलो होतो, यामागे कोणताही राजकीय अजेंडा नव्हता’, असे मत यावर अनिल चौधरी यांनी मांडले आहे.

दरम्यान या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठींबा दिला आहे. यामध्ये अनेक शेतकरी संघटना,कामगार संघटना, राजकीय पक्ष, राज्य सरकार आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारांमध्ये तामिळनाडू, छत्तीसगड, केरळ, पंजाब, झारखंड आणि आंध्रप्रदेश सरकारांनी भारत बंदला पाठींबा दिला आहे.

तर, राजकीय पक्षांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पक्ष , समाजवादी पार्टी, तेलुगु देसम पार्टी, जनता दल, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, स्वराज इंडिया, शिवसेना आणि इतर अनेक पक्षांनी भारत बंदला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या