शिरूरमध्ये राष्ट्रवादीला धक्का; ‘हा’ नेताही सोडणार पवारांची साथ ? 

blank

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. मंगलदास बांदल आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे विकासकामांच्या भुमिपुजनानिमित्त एकत्र आले होते. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधान आले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसू शकतो.

मंगलदास बांदल हे लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून उत्सुक होते परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते नाराज असल्याची माहिती आहे. अशातच त्यांची आणि आढळराव पाटील यांची जवळीक वाढल्याने ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरामुळे राष्ट्रवादीला सगळ्यात जास्त नुकसान झाले आहे. अनेक नेत्यांनी पवारांची साथ सोडली आहे. त्यात वैभव पिचड, रश्मी बागल, दिलीप सोपल, राणा जगजितसिंह पाटील, धनंजय महाडिक यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.