हे तर मी आधीच बोललो होतो…; सिद्धूच्या राजीनाम्यानंतर कॅप्टन अमरिंदर यांचे मोठे वक्तव्य

हे तर मी आधीच बोललो होतो…; सिद्धूच्या राजीनाम्यानंतर कॅप्टन अमरिंदर यांचे मोठे वक्तव्य

siddhu

नवी दिल्ली : पंजाब कॉंग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री असणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तर आता पंजाबचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष असणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. आज पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे आणि काही तासांनंतर सिद्धू यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला आहे.

दरम्यान यावर आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्वीट करत नवज्योत सिंग सिद्धूवर टीकास्त्र डागले आहे. ‘तो माणूस स्थिर नाही, त्यामुळे तो पंजाबसारख्या राज्यासाठी योग्य नाही, हे मी आधीच म्हटलं होते.’ असे ट्वीट अमरिंदर सिंग यांनी केले आहे. दरम्यान सिद्धू यांनी राजीनामा दिल्यामुळे पंजाब काँग्रेसमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नवज्योत सिंह सिद्धू यांचं नाव चर्चेत होतं. खुद्ध सिद्धू यांनाच मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. पण, काँग्रेसमधील वरिष्ठांनी सिद्धूंच्या स्वप्नावर पाणी फेरले आणि यामुळे सिद्धू नाराज असल्याचे बोलले जात होते. या कारणामुळेच कदाचित सिद्धू यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

महत्वाच्या बातम्या