हे तर बाईला नाचविणारे हे सरकार! -अजित पवार

गायीला वाचविणारे व पुन्हा बाईला नाचविणारे हे सरकार ‘लोकहितवादी’ आहे का ?

कोहापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलनाचे हत्यार पुन्हा उपसले आहे. हल्लाबोल आंदोलनाचा आता चौथा टप्पा सुरु असून राष्ट्रवादीचे नेते सरकारवर तुफान शाब्दिक फटकारे ओढत आहेत. दरम्यान, गायीला वाचविणारे व पुन्हा बाईला नाचविणारे हे सरकार ‘लोकहितवादी’ आहे का ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

अजित पवार म्हणाले, आम्हालाही गाय प्रिय आहे त्याबाबत कायदा केला. आम्हाला वाईट नाही वाटले; पण हजारो कुटुंबांचा विचार करून आम्ही ‘डान्स बार बंदी’चा घेतलेला निर्णय या सरकारने उलथवून पुन्हा ‘डान्स बार’ला परवानगी दिली. गायीला वाचविणारे व पुन्हा बाईला नाचविणारे हे सरकार ‘लोकहितवादी’ आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावताच जोरदार टाळ्या पडल्या.

हल्लाबोल आंदोलनानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत घेऊन सुद्धा सरकारवर हल्लाबोल केला. अजित पवार म्हणाले, राज्यकर्त्यांच्या अडचणीचा विषय आला की विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला जातो. न्यायव्यवस्थेत राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप होत आहे असे बोलले जात आहे. त्यामुळे हे हल्लाबोल आंदोलन झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्याचे काम करत आहे.

तसेच फेकन्यूजच्या नावाखाली कारवाई करण्याचा केंद्राचा निर्णय म्हणजे स्वातंत्र्य व पत्रकारितेवर हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न आहे. पत्रकारांच्या एकजुटीमुळे केंद्राला हा निर्णय मागे घ्यावा लागला. असे निर्णय पुन्हा होऊ शकतात, जागरूक राहण्याची गरज आहे. असे पवार म्हणाले

You might also like
Comments
Loading...