कोरोना रोखण्यासाठी असा आहे मनपाचा ‘प्लॅन’

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. विशेषतः शहरात नागरिक नियम पाळत नसल्याने कोरोना रूग्णांची संख्या अधिक गतीने वाढते आहे. कोरोनाचा संसर्ग शहरात अधिक गतीने पसरत असल्याने महापालिकेच्या यंत्रणेने आता कडक उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (दि.२२) करण्यात येणाऱ्या आवश्यक उपाययोजनांबाबत अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

शहरातील गर्दीच्या ठिकाणी मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल्स, सिनेमा हॉल, धार्मिक ठिकाणे, गार्डन्स, शॉपिंग मॉल्स, रेस्टॉरंट या ठिकाणी शासन निर्देशानुसार मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवणे, सॅनिटायझरचा वापर न करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला.

या बैठकीत कोविडबाबत करण्यात येत असलेल्या उपाय योजना, शासन निर्देशानुसार मंगलकार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, कोचिंग क्लासेस याठिकाणी करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाई आणि वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या अधिपत्याखाली असलेले फ्रंटलाईन कर्मचारी यांच्या कोविड लसीकरण बाबतचा वाॅर्ड निहाय आढावा नेमाने यांनी घेतला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे, जास्तीत जास्त आरटीपीसीआर कोरोना चाचणी घेण्यात यावी.

शासनाच्या वतीने वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सूचना नेमाने यांनी यावेळी दिल्या. यावेळी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला सर्व वॉर्ड अधिकारी, आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या