fbpx

माझ्याविरोधी राजकीय षड्यंत्र होतंय : मंगलदास बांदल

टीम महाराष्ट्र देशा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर आठ दिवसांपूर्वी शिरूर येथे अपंग महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा आठ दिवसांतच शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असल्यामुळे शिरूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याविषयी बांदल यांनी भाष्य केले आहे.

याविषयी बोलताना बांदल यांनी ‘संबंधितांना फसवणूक झाल्याचे दहा ते बारा वर्षांनी लक्षात येते आणि पोलिस एवढ्या वर्षांनी ती दाखल करुन घेवून माझ्यावर गुन्हा दाखल करतात. दोन्ही व्यवहारांत माझा कागदोपत्रीही संबंध नाही. शिवाय दोन्ही व्यवहारांमधील खरेदीखत दुय्यम निबंधकांकडे रितसरपणे झालेले आहे. त्याशिवाय ते खरेदीखत कायदेशीर ठरत नाही, हे कुणालाही समजते. या दोन्ही तक्रारींशी संबंधित दोन्ही व्यवहार पूर्ण झालेले आहेत. केवळ खरेदीदारांचा आणि माझा संबंध असल्याने मला आरोपी केले आहे. पोलिस यंत्रणांनीही लगेच माझ्यावर ४२० चा गुन्हा दाखल करुन मला पकडण्यासाठी पथक नेमून ते रवाना करणे हे सगळेच हास्यास्पद आहे अस विधान केले.

तसेच पुढे बोलताना बांदल यांनी मी व माझी पत्नी दोघेही जिल्ह्यातील दोन आणि शहरातील एका मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रमुख दावेदार आहोत. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधक आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत ज्यांना पराभव चाखावा लागला त्या सगळ्यांचेच हे कारस्थान आहे असा आरोप केला.