पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.
दरम्यान, यासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेणार याकडे समाजाचं लक्ष लागलं होतं. कारण त्यांनी काल आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच भूमिका मांडणार असल्याचे ट्विट केले होते. त्यानुसार आज पुण्यात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं आहे.
‘मराठा आरक्षणावर वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी भूमिका आहे. त्यामुळे मी लवकरच भूमिका जाहीर करणार आहे. थोड्या दिवसांतच माझी आणि समाजाची भूमिका जाहीर करणार आहे. समाजाशी आणि तज्ज्ञांची चर्चा करून भूमिका मांडणार असून माझी भूमिका म्हणजेच शाहू महाराजांची भूमिका असेल,’ असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितलय.
‘मराठा आरक्षणाच्या समस्येवर मार्ग निघेल, याविषयी मी सकारात्मक आहे. मार्ग निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही. माझी यापूर्वीची भूमिकाही समंजस होती. सध्याच्या घडीला कोरोनाची साथ रोखणे गरजेचे आहे. आपण जगलो तर मराठा आरक्षणासाठी लढा देऊ शकतो. आताच्या घडीला उद्रेक झाला तर त्याचा त्रास सामान्य माणसाला होऊ शकतो,’ असं देखील संभाजीराजे म्हणाले आहेत. त्यामुळे सध्या त्यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचं आवाहन करतानाच आरक्षणासाठी सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचं जाहीर केलं आहे.
पहा व्हिडीओ
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल’, आ. राणाजगजितसिंह यांची माहिती
- आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी हा पैसा सामान्यांसाठी वापरा : करुणा मुंडे
- बोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई
- ‘लसीकरण पूर्ण झाल्यावर आपण कोरोनाची तिसरी लाट नक्की रोखू शकू’, सुप्रिया सुळे यांचे मत
- वीरु धावला कोरोनापीडीतांसाठी, सुरु केली ‘राहत की सास’; गरजुंना मिळणार मोफत ऑक्सिजन