हे शिवशाहीचे नाही तर मोघलाईचे सरकार, मनसेचे महविकास आघाडीला थेट आव्हान!

mns

ठाणे: काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली. त्यानंतर त्यांना ठाण्यात खंडणीविरोधी विभागाने कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक देखील केली होती. कोरोनाच्या काळात अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनं होताना दिसत होते. आता, यासर्व प्रकारानंतर मनसे देखील आक्रमक होताना दिसत आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ही शिवशाही नसून मोघलाईचे सरकार असल्याची टीका एका व्हिडिओद्वारे केली आहे. यावेळी ते म्हणाले, “अविनाश जाधव यांना काल तडीपारीची नोटीस तर दिलीच, पण त्यांच्यावर ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या नर्सेसची कोव्हिडच्या कामासाठी नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती, त्यांना अचानक कामावरुन काढून टाकल्याने, अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं, हा त्यांचा गुन्हा आहे का? सरकारची हुकूमशाही वाढत आहे”.

‘हे सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका’, राम शिंदेंची खोचक टीका

तसेच, “सरकार आणि पालकमंत्र्यांना असे गुन्हे दाखल करुन आम्हाला गप्प बसवता येईल असं वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. जेव्हा सरकार आलं तेव्हा हे शिवशाहीचं सरकार असं म्हणालात, पण हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे. ही हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु, जिथे अन्याय दिसेल, तिथे मनसैनिकांची लाथ पडणार” असं देशपांडे म्हणाले.

तिघाडी सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्पेशल अपयशी ठरले आहे- रयत

आज आम्ही सर्वजण अविनाश जाधवच्या समर्थनार्थ ठाण्याला जातोय. आम्ही सर्वजण अविनाशच्या पाठिशी आहोत, आम्हाला कोण अडवतंय ते बघायचं आहे, असं आव्हान संदीप देशपांडे यांनी दिलं.

दूध उत्पादक आक्रमक : महाआघाडी सरकारचा निषेध करीत विखे पाटलांनीही केले लोणीत आंदोलन

याआधी मनसेचे कल्याणचे आमदार राजु उर्फ प्रमोद रतन पाटील यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे. “सरकारं व नोटीशीवरची नावं कधीही बदलू शकतात त्यामुळे सत्तेचा माज बरा नाही.आम्ही आमचे काम करतोय, अशा प्रकारच्या नोटीसा पाठवून व खोटे गुन्हे दाखल करून ते थांबणार नाही”, अशा शब्दांत फेसबुक द्वारे त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून तडीपारिची नोटीस का देण्यात आली?

महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी मनसे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी फेसबुकवर लाईव्ह येत, आपली बाजू देखील मांडली. तसेच, या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

वसई पालिका आयुक्तांच्या दालनात केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांना हि नोटीस देण्यात आली आहे. तर, मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून पुढील दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी अविनाश जाधव यांना स्पष्टीकरण देण्यासाठी 4 ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे.