अबब! हा गडी टाकी करायचा फुल्ल अन् व्हायचा गुल; ९ पेट्रोल पंप चालकांना लावला चुना

अबब! हा गडी टाकी करायचा फुल्ल अन् व्हायचा गुल; ९ पेट्रोल पंप चालकांना लावला चुना

petrol pump

वलसाड : पेट्रोल आणि डीझेल च्या वाढत्या किमतींमुळे सा मान्य नागरिक हैराण झाला आहे. यासाठी नागरिकांनी इलेक्ट्रिक किंवा सीएनजी वर चालणाऱ्या वाहनाचे पर्याय शोधून काढले आहेत. मात्र गुजरातच्या एका तरुणाने इंधनाचे पैसे वाचवण्याकरता चुकीचा मार्ग अवलंबला असल्याचे गुजरात पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. धवलसिंह जडेजा अस त्या तरुणाचं नाव आहे.

काही दिवसांपूर्वी त्यानं नंदीग्राममधल्या पेट्रोल पंपावर आपल्या फोर्ड एंडेव्हर गाडीमध्ये 59 लिटर डिझेल भरलं होतं. यावेळी त्याने पैसे न देताच पळ काढला होता. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध भिलड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. धवल हा गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदाबाद-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपांवर असे कृत्य करत होता.

पेट्रोल पंपांवर तो आपली कार घेऊन इंधन भरण्यासाठी जात असे, मात्र आपण पकडले जाऊ नये यासाठी तो गुन्हा करण्यापूर्वी चलाखीने आपल्या कारची नंबर प्लेट नजरेस पडू नये म्हणून ती कापडानं झाकून ठेवत होता. इंधनाची टाकी भरून झाल्यानंतर पैसे न देताच तो तेथून पळ काढत असे. आतापर्यंत त्याने अशा नऊ पेट्रोलपंप चालकांना फसवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या पेट्रोल पंपावर देखील त्याने असा गुन्हा केला होता.

या घटनेचे सीसीटीव्हीमध्ये चित्रण झाले होते. या प्रकरणी पेट्रोलपंप मालकाने त्याच्यावर तक्रार दाखल केली होती. या तरुणाला गुजरातमधल्या भिलड पोलिसांनी आता अटक केली आहे. धवलसिंह जडेजा हा गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातल्या उमरगाम तालुक्यातल्या फणसा गावचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबाचा बांधकाम व्यवसाय असून तो अतिशय श्रीमंत कुटुंबातील आहे तरी सुद्धा धवल चोरी आणि फसवणुकीसारखे गुन्हे करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या