हे तर केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरुन केलेलं भाजपचं षडयंत्र : अनिल परब

anil p

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.

एनआयए कोर्टासमोर हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील आणखी काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे २ कोटींची मागणी केल्याचा गौप्यस्फोट देखील केला आहे. यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे देखील नाव वाझेने घेतले आहे.

अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर लगेचच अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांना मी दैवत मानतो आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो असं कोणतंही कृत्य मी केलेलं नाही. मी बाळासाहेबांच्या विचारांमध्ये घडलेला शिवसैनिक आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हे आरोप ठरवून केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते तिसऱ्या मंत्र्यांच नाव बाहेर आणू असं भाकीत करत होते.

याचा अर्थ त्यांनी दोन-तीन दिवसांपासून हे प्रकरण शिजवलं आहे. त्यांनी सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण तयार केलं आहे. सचिन वाझे पत्र देणार हे कदाचित त्यांना माहिती होतं. त्यामुळे केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरुन त्यांनी आरोप केले आहेत. या पत्रात वाझेंनी माझ्यावर, अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचा माणूस म्हणून एकावर आरोप केले आहेत. पण त्याने केलेले दोन आरोपांशी माझा काहीच संबंध नाही. महापालिकेच्या कुठल्याही कंत्राटदारासी माझी ओळख नाही. त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.’असे स्पष्टीकरण यावेळी अनिल परब यांनी दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या