‘हे सरकारच एक समस्या !’ – विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार नावाची यंत्रणा असते. पण सध्या हे सरकारच लोकांसाठी एक मोठी समस्या ठरली आहे. मागील ४ वर्षात या सरकारने लोकांची कामे करण्याऐवजी दडपशाहीच केली. या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येऊ नये म्हणून विरोधी पक्षांवर तपास यंत्रणांमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारविरोधात बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांची देखील मुस्कटदाबी सुरू आहे.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेंतर्गत अमरावती विभागातील चौथ्या टप्प्याचा समारोप करताना ते बोलत होते. चिखली येथे आयोजित या जाहीर सभेला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबोधित केले.

Loading...

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवरही विखे पाटील यांनी घणाघात केला. प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही म्हणून धुळे जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी वर्षाभरापूर्वी आत्महत्या केली. पण अजूनही त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते,’ या महाराष्ट्रात गाजलेल्या ओळी आहेत. पण या सरकारच्या काळात शेतकऱ्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, मरणानेही त्यांची सुटका होत नाही. त्यांच्या कुटुंबाला सरकारकडून आधार मिळत नाही, असे विखे पाटील म्हणाले.

संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला असताना राज्य सरकार मात्र मुख्यमंत्री चषकाचे आयोजन करण्यातच व्यस्त आहे. आता पुढील निवडणुकीत या सरकारला नारळाचाच चषक दिला पाहिजे, असेही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. शिवसेनेची अयोध्यावारी म्हणजे नौटंकी आहे. सरकार म्हणून आपले अपयश लपविण्यासाठी त्यांना रामानामाचा जप सुरू केल्याची टीकाही त्यांनी केली.

बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांनी प्रास्ताविक करताना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा असल्याचे सांगितले. पंतप्रधानांना अभिनेत्रींच्या लग्नाला हजेरी लावायला वेळ आहे. पण दुष्काळग्रस्तांची विचारपूस करायला मात्र त्यांच्याकडे वेळ नसल्याचे ते म्हणाले.

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी देशात अघोषित आणिबाणी लागू असल्याचे सांगितले. भाजप-शिवसेनेचे सरकार केवळ आश्वासने देणारे सरकार आहे. आमिष दाखवणारे सरकार आहे. या देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम फक्त काँग्रेसच करू शकते, असेही ते म्हणाले.

आ. हर्षवर्धन सपकाळ यांनीही सरकारवर बोचरी टीका केली. ते म्हणाले की, हे सरकार इतिहासात केवळ थापेबाजीसाठी लक्षात ठेवले जाईल. लक्षात ठेवावी अशी सरकारचीही कोणतीही कामगिरी दिसून आलेली नाही.

आ. यशोमती ठाकूर यांनी आपल्या भाषणात उपस्थितांशी प्रश्नोत्तरे करून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये, वर्षाला २ कोटी रोजगार, शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीची मदत अशा भाजपच्या अनेक फसव्या घोषणांचा चांगलाच समाचार घेतला.

माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांनी मोदी सरकारच्या रडगाण्यावर टीका केली. हे सरकार सातत्याने काँग्रेसने मागील ६० वर्षात काय झाले, असे विचारते. पण या देशात हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांती कोणामुळे झाली, याची भाजपला जाणीव नाही का? ज्या भारतात सुई बनत नव्हती, तोच भारत स्वतः रॉकेट बनवून उडवू लागला आहे. हे काँग्रेसचे योगदान नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

संविधान बचाव रॅलीने वेधले लक्ष

जनसंघर्ष यात्रेच्या समारोपीय सभेपूर्वी चिखली शहरात विशाल बचाव रॅली काढण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचा शुभारंभ झाला. या रॅलीमध्ये एका ट्रॅक्टरवर संविधानाची पालखी ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे सर्व धर्मियांचा वेश परिधान केलेले तरूण हातात संविधानाची प्रत घेऊन या ट्रॅक्टरमध्ये बसले होते. दुसऱ्या ट्रॅक्टरवर उभे राहून काँग्रेसचे प्रमुख नेते नागरिकांना अभिवादन करीत होते. तर त्यामागे असलेल्या हजारो दुचाकीस्वारांनी जोरदार घोषणाबाजी करून शहर दणाणून सोडले होते. या विशाल व अनोख्या संविधान रॅलीने संपूर्ण चिखलीचे लक्ष वेधून घेतले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
महिला उपजिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशिलात लगावली