आजपर्यंतचा सर्वात कठीण निर्णय म्हणत, ‘या’ क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती!

sudip tyagi

मुंबई : भारताचा फास्ट बॉलर सुदीप त्यागी याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. याची माहिती सुदीपने ट्विट करून दिली आहे. ट्विटरवर सुदीपने पोस्ट केले कि,  “माझ्या स्वप्नाला निरोप देण्यासाठी हा आजपर्यंतचा सर्वात कठीण निर्णय आहे.”  33 वर्षांच्या सुदीपने भारतासाठी 4 वनडे, एक टी-20 मॅच आणि आयपीएल (IPL)मध्ये चेन्नई आणि हैदराबादसाठी 14 मॅच खेळल्या.

सुदीप त्यागीने 41 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 109 विकेट घेतल्या, तर 23 लिस्ट ए (मर्यादित ओव्हर) मॅचमध्ये त्याला 31 विकेट घेण्यात यश आलं. 23 टी-20 मॅचमध्ये त्याने 16 विकेट मिळवल्या. 2009 आणि 2010 साली त्यागी आयपीएलमध्येही खेळला. 2009 सालच्या मोसमानंतर सुदीपने मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-20 क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

दोन आठवड्यानंतर श्रीलंकेविरुद्धच सुदीप त्यागी त्याची पहिली वनडे खेळला. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात सुदीप त्यागीने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये त्याने कुमार संगकाराची एक रनवर विकेट घेतली, पण खराब खेळपट्टीमुळे ही मॅचच रद्द करण्यात आली. चार मॅचमध्ये सुदीपला फक्त 3 विकेटच घेता आल्या.

‘प्रत्येक खेळाडूचं देशासाठी खेळणं आणि देशाचा तिरंगा परिधान करण्याचं स्वप्न असतं. माझं ते स्वप्न पूर्ण झालं. धोनीच्या नेतृत्वात मी पहिली वनडे खेळलो, त्यामुळे त्याचे आभार. माझे रोल मॉडेल असलेले मोहम्मद कैफ, आरपी सिंग आणि सुरेश रैना यांनाही मी धन्यवाद देतो. हे करणं खूप कठीण आहे, पण तुम्हाला पुढे जावं लागतं,’ अशी प्रतिक्रिया सुदीप त्यागीने दिल्याचं वृत्त क्रिकबझने दिलं आहे.

सुदीप त्यागीने त्याच्या पहिल्याच रणजी ट्रॉफी मॅचमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. पहिल्याच मॅचमध्ये त्याने 10 विकेट घेतल्या होत्या, तर त्याचवर्षी 2007 सालच्या रणजी मोसमात सुदीपने तब्बल 41 विकेट घेतल्या होत्या. सुदीप त्यागीच्या या कामगिरीमुळे उत्तर प्रदेशने त्यावर्षी रणजी ट्रॉफीची फायनल गाठली होती.

आयपीएलच्या पहिल्याच मोसमात फ्रॅक्चर झाल्यामुळे सुदीप त्यागी खेळू शकला नव्हता. यानंतर पुढच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलमध्ये त्याने पदार्पण केलं. 2017 साली सुदीप त्यागी शेवटची प्रथम श्रेणी मॅच खेळला होता, तर 2014 नंतर सुदीप त्यागी लिस्ट ए किंवा टी-20 मॅच खेळला नाही.

महत्वाच्या बातम्या