fbpx

आउटगोइंग थांबेना : कॉंग्रेसची ‘ही’ महिला आमदार भाजपच्या वाटेवर

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ केलेल्या भाजपची नजर आता आगामी विधानसभा निवडणुकीवर आहे. भाजपकडून स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांना पक्षात घेतले जात आहेत.

दरम्यान, राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसला इगतपुरी विधानसभा मतदारसंघातही धक्का बसण्याची शक्यता आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. इगतपुरीमधून सलग दुसऱ्यांदा त्या निवडणून आल्या आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान,कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी १६ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, ते आमच्या संपर्कात आहेत.एवढेच नव्हे तर कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही रांग लावून उभे आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे केला आहे.

चिकलठाण्यात झालेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळाच्या कार्यक्रमात कॉंग्रेसच्या सरसाबाई वाघ यांच्यासह औरंगाबाद तालुक्यातील सरपंच,उपसरपंचासह काही कार्यकर्त्यांनी दानवे व बागडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशानंतर दानवे बोलत होते.पक्षात इनकमिंग होत असल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही. कुणी आले तरी आपले काम सुरूच ठेवायचे असते. एकनाएक दिवस तुम्हाला नक्कीच न्याय मिळतो, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.