लॉकडाउनच्या काळात ‘ही’ वाहिनी ठरली ‘अव्वल’

महाराष्ट्र देशा टीम : लॉकडाउनच्या काळात लोकांना घरातच थांबवण्यासाठी ‘रामायण’सारख्या जुन्या लोकप्रिय मालिकांचे पुन्हा प्रसारण करणे दूरदर्शनच्या चांगलेच पथ्यावर पडले असून ३ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात दूरदर्शन ही देशातील सर्वाधिक पाहिली गेलेली दूरचित्रवाणी वाहिनी ठरली आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलने (बीएआरसी) गुरुवारी जाहीर केलेल्या माहितीवरून ही बाब समोर आली आहे.

दूरदर्शनच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेतील प्रेक्षकसंख्या तब्बल ४० हजार टक्क्यांनी वाढली आहे. यामागे रामायण आणि महाभारत, या मालिकांचेच प्रामुख्याने योगदान आहे, असे ‘बीएआरसी’ने स्पष्ट केले. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात खासगी वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तीन आठवड्यांच्या लॉकडाउन दरम्यान रामायणसह महाभारत, शक्तिमान आणि बुनियाद यांसारख्या जुन्या लोकप्रिय मालिकांचे दूरदर्शनने पुन्हा प्रसारण सुरू केले आहे. यापैकी बहुतांश मालिकांची निर्मिती दूरदर्शननेच दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या क्षेत्रात मक्तेदारी असताना केली होती.

लॉकडाउनच्या कालावधीत बातम्या आणि चित्रपटांच्या वाहिन्यांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली. हिंदी चित्रपट वाहिन्यांनी जनरल एंटरटेन्मेंट वाहिन्यांनाही मागे टाकले.विशेष म्हणजे, कोणतीही मोठी क्रीडास्पर्धा सध्या सुरू नसतानाही, क्रीडाविषयक वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या २१ टक्क्यांनी वाढली. या वाहिन्यांवर केले जाणारे भारतीय क्रिकेट संघाच्या जुन्या विजयांचे तसेच डब्ल्यूडब्ल्यूई सामन्यांचे पुन: प्रसारण यासाठी कारणीभूत ठरले.

गेल्या रविवारी रात्री ९ वाजता विजेचे दिवे बंद करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते, त्यावेळी २०१५पासूनची या स्लॉटमधील सर्वात कमी प्रेक्षक संख्या नोंदवली गेली.