हा अर्थसंकल्प होता की कवी संमेलन – राधाकृष्ण विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा : अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे कौतुक करताना अनेकदा शेरोशायरी केली. यावरुन सरकारला लक्ष करीत हा अर्थसंकल्प होता की कवि संमेलन अशी अशी टीका विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद न करता त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. दारिद्र रेषेखालील लोकांना या अर्थसंकल्पात सरकारने स्थानच दिलेले नाही. त्याचबरोबर अनुसुचित जाती-जमातींसाठी गेल्यावर्षी केलेल्या तरतुदीपेक्षा प्रत्यक्षात खूपच कमी निधी वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे सरकारने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सांगितले होते मात्र, प्रत्यक्षात २ लाख लोकांनाही रोजगार मिळालेला नाही. बेरोजगारांचे आकडे सरकार लपवित असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला आहे.

तर हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पात सरकारने जुन्याच गोष्टी पुन्हा नव्याने मांडल्या आहेत. यामध्ये नुसताच आकड्यांचा खेळ करण्यात आला असून प्रत्यक्षात राज्यातील जनतेच्या हातात सरकारने भोपळाच दिला असल्याचेही विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.