सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ जेष्ठ नेता शिवसेनेच्या वाटेवर

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाचं लावला आहे. अशातच सोलापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारली आहे. तसेच सोपल यांनी बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. त्यामुळे या मेळाव्यानंतर दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यांनी जर असा निर्णय घेतला तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.

तसेच यापूर्वी बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याची चर्चा आहे. याविषयी कार्यकर्त्यांचा विचार ऐकून पक्षांतराबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती सोपल यांनी एका वृत्त वाहिनीला दिली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.