केज येथील सावंतवाडी येथे चोरट्यांनी चक्क पोलिसालाच लुटले!

बीड: एकीकडे कोरोनाचा कहर सुरु आहे तर दुसरी कडे मात्र चोऱ्या व लुटमारीचे सत्र देखील सुरूच आहे. संचारबंदीमध्ये व कोरोनामुळे अनेक लोकांच्या हाताचे काम गेले आहे. त्यामुळे पोटासाठी काही ना काही तरी करणे गरजेचे झालेले आहे, अशात अनेक लोकं चुकीच्या मार्ग निवडतात. चोऱ्या, दरोडा, जुगार, लुटमार असे अनेक गुन्हेगारी प्रकार करताना दिसत आहेत. अशीच एक घटना केज तालुक्यातील सावंतवाडी येथे घडली आहे. चोरट्यांनी चक्क पोलिसांनाच लुटले असल्याची घटना घडली आहे.

नाशिकहून लातूरकडे निघालेल्या पोलिस कर्मचाऱ्याची कार अडवून चोरट्यांनी लोखंडी गजाचा व काठीचा धाक दाखवून रोख २१ हजार रुपये, दागिने असा ९३ हजार ४०० रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना केज-मांजरसुंबा रस्त्यावरील सावंतवाडी (ता. केज) फाट्याच्या जवळ घडली. लातूर जिल्ह्यातील सलगरा बु. येथील प्रदीप अशोक कांबळे (३६) हे नाशिक पोलिस दलात नोकरीस आहेत. ते त्यांचे कुटुंब घेऊन कारने (एम. एच. ०२ ईएच १०६८) नाशिकहून लातूरकडे निघाले होते.

शुक्रवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास त्यांची कार केज-मांजरसुंबा रस्त्यावरील सावंतवाडी (ता. केज) फाट्याजवळ आली. तेव्हा तिथेच दाबा धरून बसलेले चोरटे अचानक कारसमोर आले. अचानक कारच्या समोर आल्याने त्यांनी ब्रेक दाबले. चोरट्यांनी कारची चावी काढून घेत गज व काठीचा धाक दाखवून २१ हजार रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा ९३ हजार ४०० रुपयांचा ऐवज घेत चोरटे पसार झाले. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP