‘ते तुमच्यावर विश्वास दाखवत नाहीत’; KKR च्या दिग्गजाची आपल्याचं टीमवर टीका

kuldip

मुंबई : ८ सप्टेंबर रोजी भारतीय क्रिकेट मंडळाने ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली आहे. विश्वचषक संघात यावेळी मोठे बदल दिसून आले आहे. टी 20 साठी निवडलेल्या संघात काही खेळाडूंना प्रथमच संधी देण्यात आली आहे. पाच वर्षांनंतर होणाऱ्या आयसीसीच्या या मेगा इव्हेंटसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघात अशा सात खेळाडूंना स्थान दिले आहे, जे पहिल्यांदा टी -20 विश्वचषकात खेळतील.

दरम्यान, भारताचा चायनामन स्पिनर कुलदीप यादव याच्यावर सध्या काळे ढग फिरताना दिसत आहेत. भारताच्या टी-20 वर्ल्ड कप टीममध्ये कुलदीपचा समावेश झाला नाही. यावरच आता कुलदीपने नाराजी व्यक्त करत त्याची आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सवरच टीका केलीये. केकेआर टीम मॅनेजमेंटमधलं कोणीही बोलत नाही, तसंच आपल्या क्षमतेवरही विश्वास दाखवला जात नाही. तसेच आपण अनेकवेळा अंतिम 11 खेळाडूंमध्ये आहोत का नाही, ते पण कळत नाही. आकाश चोप्राच्या युट्यूब चॅनलवर बोलताना कुलदीपने ही खंत व्यक्त केली.

‘अनेकवेळा आपला 11 खेळाडूंमध्ये खेळण्या लायक आहोत असं वाटतं, पण टीममध्ये स्थान मिळत नाही. अनेकवेळा आपण टीमसाठी मॅच जिंकवून देऊ शकतो, असं वाटतं. पण आपण टीममध्ये का नाही, हे कळंतही नाही. टीम मॅनेजमेंट फक्त दोन महिन्यांचं प्लॅनिंग करतं.

पुढे तो म्हणाला,’जेव्हा एखादा खेळाडूचा अंतिम-11 मध्ये समावेश होत नाही. तेव्हा टीम मॅनेजमेंट त्याच्यासोबत बोलतो, पण केकेआरच्या टीममध्ये असं होत नाही. बॉलर म्हणून आपल्यावर विश्वास दाखवला जात नाही. आयपीएलच्या पहिल्या राऊंडमध्ये मी केकेआरच्या टीम मॅनेजमेंटसोबत मी बोललो, पण कोणीही मला स्पष्टीकरण दिलं नाही,’ अशी प्रतिक्रिया कुलदीपने दिली आहे.

‘परदेशी खेळाडूच्या तुलनेत भारतीय कॅप्टन असेल, तर त्याच्याकडे जाऊन आपण टीमचा भाग का नाही, हे विचारू शकतो. परदेशी कॅप्टनसोबत असा संवाद होऊ शकत नाही. इयन मॉर्गन मला कसा बघतो माहिती नाही, त्यामुळे कम्युनिकेशन गॅप वाढते,’ असंही कुलदीप म्हंटला.

मागील काही काळापासून कुलदीप यादवला चांगली कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपपर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीप भारताचा प्रमुख फिरकीपटू होता. मात्र सातत्याने खराब कामगिरी करत असल्यामुळे त्याला संघात स्थान मिळवणेही अवघड झाले आहे. मात्र, श्रीलंका दौऱ्यावर तसेच त्यानंतर उर्वरित आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून चांगली कामगिरी केल्यास यंदा होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळेल अशी कुलदीपला आशा होती मात्र यावेळीही कुलदीपचा  टी-२० वर्ल्डकपमध्ये समावेश झाला नाही.

महत्वाच्या बातम्या :