काँग्रेस महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर उदासीन – मोदी

pm-modi

विजयपुरा – कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला वेग आला असून, प्रचारादरम्यान आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. दरम्यान कर्नाटक सरकार महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर उदासीन असल्याची टीका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते कर्नाटकमध्ये विजयपुर येथील निवडणुक प्रचार सभेत बोलत होते.

मोदींनी यावेळी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, कर्नाटकात महिलांच्या सुरक्षेसाठी काँग्रेसचे सरकार काहीही करीत नाही. तर, केंद्रातील भाजपाच्या सरकारने मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याचा निर्णय घेतला आहे. मुलगी कोणत्याही जाती-धर्माची असू देत ती मुलगीच असते. त्यामुळेच मुस्लिम मुलींना तिहेरी तलाकच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी भाजपाने कायदा आणला मात्र, काँग्रेसने हा कायदा मंजूर होऊ दिला नाही.

विजयपुरमधील प्रचार दौऱ्यात मोदींनी अनेक मोठ्या घोषणाही केल्या. ते म्हणाले, कर्नाटकात जर भाजपाचे सरकार आले तर येथे अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्यात येईल. त्याचबरोबर येथे हॉर्टिकल्चरला प्रोत्साहन दिले जाईल. यावेळी भुमिहीन आणि शेतमजूरांसाठी एक लाख रुपयांच्या वीम्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.