त्यांना सोबत जगणे शक्य नव्हते, म्हणून जीवन संपवले एकत्रच! घेतला एकाच दोरीने गळफास

उस्मानाबाद : उस्मानाबादच्या वाशी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरमकुंडी शिवारातील शेतामध्ये झाडाखाली दुचाकी उभी करून त्यावर उभारत प्रेमीयुगुलाने गळफास घेतला. ही घटना शनिवारी (दि. ६) सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे त्याच दिवशी म्हणजेच ६ मार्चला मृत मुलाचा वाढदिवस होता. यावेळी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र आढळून आले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, सरमकुंडी येथील सुनील मुकुंद कांबळे ( वय १८) आणि १६ वर्षे ७ महिन्यांच्या मुलीचे प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, दोघेही भावकीतील असल्याने लग्नास विरोध होता. त्यामुळे ते दोघेही ४ मार्च रोजी मध्यरात्री घरातून पळून गेले होते. याबाबत वाशी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. ५) गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुलगी अल्पवयीन, तर मुलाला १८ वर्षे पूर्ण झालेली होती. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता.

परंतु, शनिवारी (दि. ६) सरमकुंडी शिवारातील मुकुंद रूपवंत कांबळे यांच्या शेतामध्ये सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्या दोघांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी झाडाखाली दुचाकी असून त्यावर उभा राहून गळफास घेतल्याचे समजते. तसेच मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र आढळून आले. याबाबत वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या