ते देशाला मानत नाहीत तर धर्मावर आधारित असलेल्या एका भूमीला मानतात – एम. जे.अकबर

pak-grants-nationality-to-298-indians-in-5-years-ministry

दहशतवादाला आसरा आणि प्रोत्साहन देणारे देश आत्महत्येला आमंत्रण देत आहेत, असे म्हणत भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे.अकबर यांनी पाकिस्तानला रडारवर घेतले. ‘दहशतवादाचे आश्रयदाते देश दहशतवाद्यांइतकेच दोषी आहेत. काही इस्लामिक राष्ट्रांमध्ये सध्या अतिशय धोकादायक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत या संघटना धर्मालाच सर्वोच्च समजतात. त्यांच्याकडून अतिशय निर्घृणपणे लोकांच्या हत्या केला जातात. मोठ्या प्रमाणात नरसंहार केला जातो. या संघटनांशी दोन हात करुन त्यांचा बिमोड करण्याची वेळ आता आली आहे,’ असे अकबर यांनी म्हटले

संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानला ‘टेररिस्तान’ म्हटल्यानंतर आता किर्गिझस्तानमधील बिश्केक येथील परिषदेत भारताने पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. दहशतवादाला आसरा देणारी सरकारे आत्महत्येला निमंत्रण देत आहेत, अशा शब्दांमध्ये भारताने नाव न घेता पाकिस्तानवर टीका केली.

भारत सध्या पाकिस्तानला विविध जागतिक मंचांवर दहशतवादाच्या मुद्यावरुन उघडे पाडत आहे. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे प्रयत्न सध्या भारताकडून सुरु आहेत.किर्गिझस्तानमधील बिश्केकमध्ये ‘इस्लाम इन मॉर्डन सेक्युलर स्टेट’ या विषयावर एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर सहभागी झाले आहेत. या परिषदेत बोलताना अकबर यांनी पाकिस्तानवर कठोर शब्दांमध्ये टीका केली.

धर्मावर आधारित दहशतवाद आधुनिकतेच्या विरोधात आहे. अशा प्रकारचा दहशतवाद कोणत्याही देशासाठी मोठे आव्हान आहे,’ असे अकबर यांनी म्हटले. या परिषदेत बोलताना अकबर यांनी पाकिस्तानचा उल्लेख केला नाही. मात्र त्यांचा संपूर्ण रोख पाकिस्तानवरच होता. ‘ते (पाकिस्तान) धर्मावर आधारित असलेल्या एका भूमीला मानतात. ते देशाला मानत नाहीत. त्यांचा देशावर विश्वास नाही. दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांमुळे किर्गिझस्तान, इराक, सोमालिया आणि भारतासारख्या देशांना मोठा धोका आहे,’ असेही ते म्हणाले.