ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला दणका, ‘या’ महिला आमदार करणार शिवसेनेत प्रवेश?

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु झाले आहे. अनेक कॉंग्रस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करून आगामी सत्तेची फळे चाखण्यासाठी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. अशाच पद्धतीने कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे. माजी एकनिष्ठ नेत्याची मुलगी ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

नाशिकच्या इगतपुरी येथील काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात शिवसेनेचे नेते व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत निर्मला गावित यांची बैठक देखील झाली आहे. या बैठकीत निर्मला गावित यांचा शिवसेना पक्ष प्रवेश जवळपास निश्चित झाल आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाची सत्ता नसल्याने मतदारसंघात विकासकामे करता येत नाहीत, अशी निर्मला यांची भावना झाली होती. शिवाय पक्षात त्या काही दिवसांपासून नाराज होत्या. पुढील आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत निर्मला गावित शिवसेनेत प्रवेश करतील असे सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान नऊ वेळा खासदार व दोन वेळा राज्यमंत्रिपद भूषवलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांच्या निर्मला गावित या कन्या आहेत. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून काँग्रेसशी निष्ठावंत असलेल्या या कुटुंबातील एक महिला नेत्या पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.