भाजपचा डाव फसला ? राजीनामे मंजूर झाले तरी होणार नाही पोटनिवडणूक

blank

औरंगाबाद : शिवसेना-भाजपची युती मुख्यमंत्रिपदावरून तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील वाद पेटतच आहे. शुक्रवारी (ता.13) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामा दिल्याचे आमदार अतुल सावे यांनी जाहीर केले. नगरसेवकांनी नियमानुसार आयुक्तांकडे राजीनामे देणे गरजेचे आहे. भाजप नगरसेवकांनी आयुक्तांकडे राजीनामे दिल्यानंतर ते मंजूर झाले तरी महापालिकेतील सत्तेवर परिणाम होणार नाही. कारण महापौरांवर अविश्‍वास ठरावाची कायद्यात तरतूदच नाही आणि निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर आल्यामुळे पोटनिवडणुकीचीही शक्‍यता नाही.

महापालिकेत शिवसेना-भाजप युती 25 वर्षांपासून सत्तेवर असून, दोन्ही पक्षांनी आलटून-पालटून सत्ता उपभोगली आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेला व राज्यात नवे समीकरण उदयास आले. तेव्हापासून शिवसेना-भाजपमधील वाद धुमसत आहे. महापालिकेच्या गेल्या सर्वसाधारण सभेत स्वतंत्र चूल मांडणाऱ्या भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी शिवसेनेवर टीकेची झोड उठविली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बिनखात्याचे मुख्यमंत्री अशी झालेली टीका शिवसेनेच्या जिव्हारी लागली. त्यामुळे शिवसेनेनेदेखील भाजपला जशास तसे उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदन ठरावात विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा आयुक्तांकडे राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली. त्यानंतर शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. त्यानंतर आमदार सावे यांनी भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत, युती तुटली असे जाहीर केले.

या राजीनाम्यावर दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. दोन दिवसांनंतर भाजप नगरसेवकांनी आयुक्तांकडे राजीनामे दिले व ते मंजूर झाले तरी महापालिकेतील सत्तेवर काहीच परिणाम होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. महापालिकेची एप्रिल 2020 मध्ये निवडणूक होणार असून, एवढ्या कमी काळासाठी पोटनिवडणुका होण्याची शक्‍यता धूसर आहे. शिवाय महापौरांवर अविश्‍वास ठराव आणण्याची तरतूदही कायद्यात नाही, असे सूत्रांनी सांगितले.

फक्त 38 नगरसेवकांची गरज
महापालिकेत भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत असेल, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे महापौरांची ते कोंडी करतील, असा अंदाज बांधला जात आहे. महापौरांना सभा चालविण्यासाठी फक्त 38 नगरसेवकांची उपस्थिती गरजेची आहे. 115 सदस्य असलेल्या महापालिकेत शिवसेना-32, भाजप-22, एमआयएम-25, कॉंग्रेस-आठ, राष्ट्रवादी कॉंग्रेस-चार, इतर-24 असे बलाबल आहे.

महत्वाच्या बातम्या :