जीएसटी परताव्यावरून अजितदादा-चंद्रकांतदादांमध्ये रंगणार कलगीतुरा?

ajit pawar and chandrkant patil

मुंबई – केंद्रीय अर्थमंत्रालयाने महाराष्ट्राला जीएसटीचे 11 हजार 519.31 कोटी रक्कम वितरित केले आहे. आहे, त्यामुळे आता तरी महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम कोविडच्या उपाययोजना व राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी वापरावी व प्रत्येक गोष्टींचे खापर केंद्र सरकावर फोडणे बंद करा असा मार्मिक टोला भाजापचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे.

राज्याच्या महसूली उत्पन्नात आधीच ७५ हजार कोटींची तूट आहे. या शिवाय केंद्राकडून २५ हजार कोटींचा जीएसटीचा परतावा यायचा आहे. मार्चपर्यत हा परतावा न आल्यास राज्याचा अर्थसंकल्प १ लाख कोटी रुपये तुटीचा राहू शकतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले होते.महाविकास आघाडी सरकारचा आतापर्यंत चा बराच काळ कोरोना महामारीत गेला. त्यामुळे विकास दर घटलाय. त्यामुळे अनेक कामांना कात्री लावावी लागली असे देखील पवार म्हणाले होते.

याला प्रत्युत्तर पाटील यांनी दिले आहे. प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर खापर फोडायचे व जीएसटीच्या थकबाकीचे कारण सांगून आपली जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचे काम नेहमीच महाविकास आघाडी सरकार करीत आहे अशी टिका पाटील यांनी केली. परंतु गेल्याच आठवड्यात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गेल्या चार महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2020 पासून राज्य व केंद्र शासित प्रदेशांना जीएसटीच्या पोटी 1 लाख कोटी रुपये वितरित केले आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

पुढे पाटील म्हणाले की, अर्थ मंत्रालयाने देशातील 28 राज्ये व तीन केंद्र शासित प्रदेशांना जीएसटी परताव्याची रक्कम वितरित केली आहे. त्यापैकी महाराष्ट्राला मिळालेली जीएसटीची रक्कम ही दुस-या क्रमांकाची आहे. त्याचप्रमाणे २०१९-२० मध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक जी एस टी परताव्याची रक्कम १९ हजार २३३ कोटी देण्यात आल्याचेही पाटील यांनी निर्दशनास आणून दिले.

देशावर कोरोनोचे संकट असतानाही केंद्र सरकारने 1 लाख कोटीचा जीएसटीचा परतावा देशातील सर्वच राज्यांना दिला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी जीसीटी थकबाकीचे कारण सांगणा-या महाविकास आघाडीने राज्याचा विकास गतीने करुन दाखवावा व जीएसटी थकबाकीचे कारण देऊन नये असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

जीएसटीतील नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून वेळेवर मिळत नाही, त्याचा परिणाम विकासकामांवर होत आहे. राज्यातील कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टीसाठी नुकसान ग्रस्तांना मदतीसाठी निधी देता येत नाही असा दावाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमी केला होता असेही पाटील यांनी स्पष्ट कले.दरम्यान,पाटील यांनी केलेल्या या टीकेला आता अजित पवार किंवा महाविकास आघाडीतील नेते कसे उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या