औरंगाबादेतील महेमूद दरवाजाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेतील निधीतून शहरातील ऐतिहासिक दरवाजांची डागडुजी सुरू आहे. ऐतिहासिक दरवाजांतील एक असलेल्या पाणचक्की येथील महेमूद दरवाजाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणारे. इंटेक संस्थेच्या माध्यमातून हे ऑडिट करण्याचा निर्णय मनपाच्या हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात हेरिटेज संवर्धन समितीची बैठक झाली. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याबद्दलचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. यामध्ये शहरातील ९ ऐतिहासिक दरवाजांची डागडुजी सुरू आहे. शहागंज येथील क्लॉक टॉवरचे काम सुरू केले आहे. महेमूद दरवाजाची स्थिती नाजूक असून, त्याच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. रोशनगेट व इतर दरवाजांच्या समोर लावलेले विजेचे खांब व डीपी हटविण्याची सूचना समितीच्या सदस्यांनी केली. त्यांच्या सूचनेनुसार काम करण्याचे आदेश प्रशासकांनी अधिकाऱ्यांना दिले.

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम हाती घेतल्याबद्दल हेरिटेज संवर्धन समितीतर्फे प्रशासकांचे स्वागत करण्यात आले. नहर- ए- अंबरी, पाणचक्कीजवळ नहरींची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यांचे सर्वेक्षण करण्याची सूचना रमजान शेख यांनी केली. समितीमध्ये नव्या पिढीलाही विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी संधी द्यावी, अशी सूचना प्रशासकांनी केली.

महत्वाच्या बातम्या