“राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर बसायची इच्छा नव्हती; मी त्यांच्यासाठी कलंकित होतो”

टीम महाराष्ट्र देशा – ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादीत मी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करीत राहिलो आहे. ‘राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर बसायची इच्छा नव्हती, कारण मी त्यांच्यासाठी कलंकित होतो’. पण आता मला भाजपच्या रुपाने सात्विक उंबरठा दिसला आहे. माझे उर्वरित आयुष्य मी तिथेच कोणत्याही अपेक्षेविना व्यतित करणार आहे. २०२४च्या निवडणुकीवेळी मी पक्षाकडे विचार करण्याची मागणी ठेवेन,” असे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आज सांगितले. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

त्यावेळी ढोबळे म्हणले, माझा राष्ट्रवादी पक्षावर आजिबात राग नाही. त्यांनी मला भरपूर संधी दिली. नेते शरद पवार यांनीही मला नेहमीच बळ दिले आहे. परंतु आता पक्षाला नव्या दमाचा कर्तुत्ववान आमदार मिळाला आहे. त्याचे कर्तृत्व महान आहे. त्यामुळे माझ्यासारख्या म्हाताऱ्या कार्यकर्त्याला पक्षाने दूर केले आहे. गेली चार वर्षे मी अडगळीतच होतो. या काळात मी आत्मचिंतन केले. जातीयवादी म्हणवणारे आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्षांचा अभ्यास केला. माझ्या असे लक्षात आले की गेल्या दहा वीस वर्षात दलितांवर अत्याचार करणारे वेगळेच आहेत. त्यामुळे आता मला विचारांती भाजपचा सात्विक उंबरठा दिसला. तिथे जायचा मी निर्णय घेतला. आता माझ्या सर्वच संस्थामध्ये आधीच्या महापुरुषांच्या बरोबरीने दिनदयाळ उपाध्याय, रामभाऊ म्हाळगी या महनीय व्यक्तींचीही छायाचित्रे लावली आहेत. मला नव्या विचाराने वाट चालायची आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी जिल्ह्यांचा दौरा करीत आहे. माझ्या बहुजन रयत संघटनेचे २६ जिल्ह्यातील एक हजार कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. त्यांच्या माध्यामातून पक्षाचे एक लाख सभासद करणार आहे. त्या सभासदांचा महिन्याभरात सोलापूरमध्ये मेळावा घेणार आहे. असल्याचे ही ढोबळे यांनी सांगितले.