मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता : महाजन

girish mahajan

जळगाव  – मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरविलं आहे. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा गायकवाड आयोगाचा निष्कर्षही चुकीचा असल्याचं निरीक्षण पाच न्यायमूर्तींच्या पूर्ण पीठाने निकालात नोंदवलं आहे.

गायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्याजोग्या नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगितलं. 50% ची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण अवैध असल्याचं कोर्टाने सांगितलं.

मराठा समाज हा आर्थिक मागास वर्गात मोडला जात नाही. जे मागास समाजातील वर्ग आहे, त्यांना आरक्षण लागू असणार आहे. राज्य सरकारने तातडीची बाब समजून आरक्षणाचा निर्णय घेतला होता. पण, आता राज्यात कुठेही अशी परिस्थिती नाही. त्यामुळे 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याबाबत पुन्हा चर्चा होऊ शकत नाही, असं मतही न्यायमूर्तींनी नोंदवलं. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणे हे राज्य घटनेच्या कलम 14 च्याविरोधात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला देता येणार नाही. 50 टक्के आरक्षण देणे हे उल्लंघन आहे, असं मतही न्यायालयाने नमूद केले आहे.

या निकालानंतर राज्यातील विरोधकांनी सरकारला घेरलं असून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नसल्यानेच हे घडले आहे. सरकारमध्ये नियोजनाचा व समन्वयाचा अभाव होता, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

महाजन म्हणाले, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता. अर्धे मंत्री काय सांगायचे तर अर्धे मंत्री काय सांगायचे. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या बाजूने तोंड करून उभे होते. आरक्षणाच्या बाबतीत या सरकारमध्ये एकमत होते का? हा प्रश्न आहे. सगळ्या मंत्र्यांचे वक्तव्य तपासून पाहा, त्यावर हे लक्षात येते. कुणीही हा विषय गांभीर्याने घेतला नाही, म्हणून हा दुर्दैवी दिवस उगवला असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या