स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाच्या जनजागृतीची लोकचळवळ व्हावी : नितीन गडकरी

स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाच्या जनजागृतीची लोकचळवळ व्हावी : नितीन गडकरी

Nitin Gadkari

नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. अनेकांच्या योगदानामुळे आजचे हे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत. मात्र हे योगदान नव्या पिढीला ज्ञात नाही. श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांनी झेंडागीत लिहुन स्वातंत्र्य समरातील क्रांतिकारींमध्ये स्फुल्लींग चेतविले. श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांनी लिहिलेल्या झेंडागीताच्या ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहें हमारा’ या ओळी आजही गर्वाने मान उंचावतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त झेंडागीताचे सामूहिक गायन हा देशभक्ती जागवून नव्या पिढीला स्वातंत्र्याच्या इतिहासाशी जोडण्याचा पथदर्शी उपक्रम आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाचे वेळोवेळी स्मरण व्हावे, नवी पिढी या इतिहासाशी एकरूप व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाच्या जनजागृतीची लोकचळवळ व्हावी, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

झेंडागीताचे रचयिता श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्तशहरातील स्वयंसेवी संस्थांसह शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदविला.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका, खादी ग्रामोद्योग आयोग आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील १२५ ठिकाणी मोठ्या उत्साहात सामूहिक झेंडागीत गायन करण्यात आले. यावेळी विविध चौकांमध्ये देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले संपूर्ण शहरात पुन्हा एकदा स्वातंत्र्याचे रंग उधळलेले दिसून आले.

संविधान चौकामध्ये झेंडागीत गायनाच्या मुख्य कार्यक्रमाचा रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या वेळेस विविध मान्यवर मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पद्मश्री श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांनी रचलेले झेंडागीत पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समक्ष सरोजीनी नायडू यांनी गायले. प्रत्येक देशवासीयाच्या मनात आजही देशभक्तीचे बिजारोपण करण्याची क्षमता या गीतामध्ये आहे. या गीताचे एवढ्या व्यापक प्रमाणात सामूहिक गायन करून मनपाने श्यामलाल गुप्त यांना केलेले अभिवादन हे स्तूत्य आहे, अशा शब्दांत त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

देशभक्ती गीतांची विशेष स्पर्धा घ्या

स्वातंत्र्य समराच्या लोकचळवळीमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे आवश्यक असून त्यांचा व्यापक प्रमाणात सहभाग असावा यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्याची सूचना यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ‘आझादी-७५’ च्या निमित्ताने नागपूर शहरातील किमान १ लाख विद्यार्थी स्वातंत्र्यगीतामध्ये सहभागी व्हावेत त्यांना गीताच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीचा परिचय व्हावा त्यांनी इतिहास जाणून घ्यावा या यामागील उद्देश आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. यामध्ये शहरातील सर्व शाळांचा सहभाग घेण्यात यावा. दहाही झोनस्तरावर या स्पर्धेचे आयोजन करून विजयी संघांना आकर्षक रोख पुरस्कार खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे देण्यात येतील. शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा मानस असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

जेव्हा मनपाच्या शिक्षकांनी गायले मुंबईत स्वागत गीत

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईमधील सायन पूलाच्या लोकार्पण प्रसंगी मनपाच्या शिक्षकांनी सादर केलेल्या गीतासंबंधी आठवण सांगितली. १९९८ साली ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना सायन येथील पूलाचे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वागत गीत सादरीकरणासाठी विशेषरूपाने नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मनपाच्या शिक्षकांनी सादर केलेल्या गीतांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केल्याची आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली.

महत्त्वाच्या बातम्या