बाळासाहेबांच्या स्मारकासाठी तीन वेळा निविदा प्रक्रिया करूनही प्रतिसादच नाही

सोलापूर: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभे करण्यासाठी राज्यात पहिला ठराव सोलापूर महापालिकेत २० नोव्हेंबर २०१२ साली झाला. त्यानंतर जागेचा पाठपुरावा शिवसेनेने केला. पोलिस मुख्यालयाच्या समोरची जागा निश्चित झाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते स्मारकांचे भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी महापालिकेने पहिल्या टप्प्यातील ५.१७ कोटींच्या कामाचा टेंडर महापालिकेने काढले. तीन वेळा टेंडर काढून काम घेण्यासाठी मक्तेदार पुढे आले नाहीत. त्यामुळे महापालिकेने पुढील प्रक्रिया बंद केली आहे.

यापुढे स्वत:हून मक्तेदार पुढे आल्यास त्यांच्या नावाची शिफारस करून त्यांना काम देण्याचा विचार असल्याचे नगरअभियंता लक्ष्मण चलवादी यांनी सांगितले. २०१२ला स्मारकाचा ठराव संमत झाला तेव्हा जागा निश्चित झाली नव्हती. नंतर स्मारकासाठी बजेट उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत टेंडर काढले जात नव्हते. याबाबत शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर महिन्यात सोलापुरात बैठक झाली. त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते महापौर शोभा बनशेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पाच कोटी १७ लाख ४० हजार रुपयांच्या कामाचे पहिल्या टप्प्यात नियोजन स्मारकांच्या कामासाठी महापालिका नगर अभियंता विभागाने १७ नोव्हेंबर २०१७, १ जानेवारी २०१८ रोजी टेंडर काढण्यात आले. १०.९५ कोटीच्या कामापैकी पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५ कोटी १७ लाख ४० हजार रुपयांची कामे करण्यात येणार आहे. त्यात सुरक्षा भिंत, बाजूचे विकास, तळमजला, पहिला मजल्याचा समावेश आहे. या कामासाठी महापालिकेने तीन वेळा टेंडर काढले पण एकही मक्तेदार पुढे आला नाही त्यामुळे महापालिकेने पुढील प्रक्रिया बंद केली आहे. एखादी एजन्सी स्वत:हून पुढे आल्यास त्यांच्या नावाची शिफारस करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापालिका सभागृहात २० नोव्हेंबर २०१२, २८ फेब्रुवारी २०१४, ३१ एप्रिल २०१५, आणि १० डिसेंबर २०१६ असे चार वेळा एकमताने ठराव केला. भांडवली कामातून निधी असल्याने मक्तेदार पुढे येईना असे सांगण्यात आले.

You might also like
Comments
Loading...