गृह कर्जासह वाहन कर्जाच्या ईएमआयमध्ये बदल नाही, रिझर्व्ह बँकेने रेपो दर ठेवला ‘जैसे थे’

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील ही पहिलीच बैठक होती. ५ एप्रिल पासून सुरू असलेल्या या बैठकीतील निर्णयांची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे कर्जदारांच्या ईएमआयमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही.

सध्या रेपो दर ४ टक्के असून रिव्हर्स रेपो दर ३.५ टक्क्यांवर आहे. हे दोन्ही दर कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. देशात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून या आकडेवारीवर आमचे लक्ष असल्याचे दास यांनी सांगितले. रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली. या आधी ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत देखील रेपो दरात कोणताच बदल करण्यात आलेला नव्हता.

गेल्या वर्षी मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने दरामध्ये बदल केलेला नाही. तर सध्याचे दर गेल्या १५ वर्षाच्या नीचांकी पातळीवर आहेत. बँकांना देण्यात आलेल्या कर्जावर रिझर्व्ह बँक घेत असलेल्या व्याजाला ‘रेपो दर’ असे म्हटले जाते. तर बँकांच्या वतीने रिझर्व्ह बँकेत जमा ठेवण्यात आलेल्या पैशांवर रिझर्व्ह बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या व्याजाला ‘रिव्हर्स रेपो’ दर असे म्हटले जाते.

महत्त्वाच्या बातम्या