राहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : मल्लिकार्जुन खर्गे

kharge

मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यंना निमंत्रित केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र राहुल गांधी किंवा काँग्रेसचे कुणी अन्य नेते संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले आहे. गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना खर्गे यांनी केंद्र आणि संघ आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली.

संघाने पुढील महिन्यात ‘भविष्य का भारत’ कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी आरएसएसकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माकपाचे नेते सीताराम येचुरी यांना निमंत्रण पाठवण्याचे निश्चित केल्याचे वृत्त आले होते. आरएसएसचा हा कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राहुल गांधींना देण्यात येण्याचे वृत्त आल्यापासून देशभरात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती.

नेमकं काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे

‘आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राहुल गांधी यांना अद्याप अधिकृत पत्र आलेले नाही. हे निमंत्रण आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पाठवण्यात आले आहे. मात्र राहुल गांधी किंवा काँग्रेसचे अन्य नेते संघाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा प्रश्न उद्भवत नाही’.