पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप नाही, ते सोयीप्रमाणे काम करतायत; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

dilip walse patil and police

मुंबई : दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2 पाकिस्तानी नागरिकांसह एकूण सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली. दिल्लीमध्ये काल 6 दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याची माहीती मिळाली अन् राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरूनच भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘जगातील सर्वोत्तम समजलं जाणाऱ्या महाराष्ट्र पोलिसदलाला आज राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना काम करता येत नाही. गंभीर गुन्ह्यांचं काम सोडून सरकारला विरोध करणाऱ्या प्रत्येकाविरोधात पोलिस वापरले जात आहेत. त्याचा परिणाम राज्याला परवडणारा नाही.’ असे ट्वीट करत केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य करत हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘पोलीस खात्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप केला जात नाही. पोलिसांना त्यांना सोयीप्रमाणे, प्रोफेशनल पद्धतीनुसार काम करण्यास परवानगी आहे. पोलीस राज्यात प्रोफेशनल पद्धतीनेच काम करतायत हे मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं,’ असं गृहमंत्री म्हणाले.

यासोबतच, ‘पोलिसांना चौकशीबाबत संपूर्ण स्वातंत्र्य असून ते त्यांच्या पद्धतीनं तपास करत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीनं काम करु द्यायला हवं. उगाच कुणी राजकारण करण्याची गरज नाही,’ असं प्रत्युत्तर देखील त्यांनी विरोधकांना दिलं आहे. दरम्यान, याविषयी अधिक तपास हा सुरु असून संवेदनशील विषय असल्याने इतर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

महत्त्वाच्या बातम्या