‘नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता आज देशात कुठेही नाही’; राऊतांकडून कौतुकाचा वर्षाव

sanjay raut

मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. दरम्यान आता मोदींना राजकारणातील दिग्गज नेत्यांनी शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले आहे.

दरम्यान आज मोदींना शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता आज देशात कुठेही दिसत नाही. मोदी यांच्याबद्दल कितीही वाद असले तरी ते देशाचे पंतप्रधान आहेत. म्हणून आपण त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात, नरेंद्र मोदी हे देशाचे मोठे नेते असून ते अनेक वर्षापासून ते देशाचे नेतृत्व करत आहेत.

आम्ही त्यांच्या संघर्षाचा काळ पाहिला आहे. मोदी सरकारच्या काळात देशाला राजकीय स्थैर्य लाभले. भाजपाने नेहमीच आघाड्या बनवून सत्ता मिळवली, पण मोदींच्या काळात एक हाती सत्ता स्थापन केली. ही त्यांच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे, हे मान्य करायला हव.’ असा कौतुकाचा वर्षाव त्यांनी मोदींवर केला आहे.

तर आज संध्याकाळी त्यांचा वाढदिवस संपल्यानंतर ते कोणता केक कापतात हे बघावे लागेल, मात्र मला खात्री आहे की या देशातील जनतेच्या महागाई विषयीच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोचल्या असतील. त्यामुळे संध्याकाळपर्यंत मोदीजी पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणारा केक कापतात का, यावर आमचे लक्ष असेल, असा खोचक टोला देखील लगवायला ते विसरले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या