fbpx

पवारांच्या घरात चहा प्यायलाही कुणी नाही, सगळेच प्रचारात व्यस्त : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुन्हा एकदा पवार घराण्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबाला टोला लगावला आहे. कुणीही चहा प्यायलाही घरात भेटत नाही कारण सगळेच प्रचारात व्यस्त आहेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

बारामती मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सुपा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की अनेक वर्षांपासूनची प्रलंबित कामं मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावली आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादीचा पराभव अटळ आहे. पुढे बोलताना त्यांनी ‘या जन्मी जे कराल ते इथेच फेडावं लागेल. शरद पवारांनी आतापर्यंत जे केलं त्याची फेड त्यांना करावीच लागेल, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांची सभा सुरु होण्यापूर्वी सुपा परिसरात पावसाने हजेरी लावली. . ‘ज्या शरद पवारांनी वर्षानुवर्षे सुपा भाग दुष्काळी केला, त्या भागात मुख्यमंत्र्यांचं आगमन होताच पाऊस आला असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना लगावला.