‘चित्रपटसृष्टीत घराणेशाही नाही’- ऋषी कपूर

Dr. Jabbar Patel (R) in conversation with Rishi Kapoor (L)

पुणे : ‘‘कपूर घराण्यात जन्माला आल्यामुळे तुम्हाला एक विशेष ओळख मिळते, पण त्याच वेळी तुमच्या खांद्यावर अपेक्षांचे मोठे ओझे आणि जबाबदारी असते. चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे, असे म्हटले जाते, परंतु माझ्या मते ते खरे नाही. रणबीर कपूर, करीना कपूर यांचे पहिले सिनेमे तिकीट खिडकीवर चालले नाहीत, पण तुमच्यात अभिनयाचे गुण असतील तर तुम्ही यशस्वी होताच. कोणताही अभिनेता प्रेक्षकांच्या माथी मारता येत नाही. अभिनेते आणि राजकारणी हे लोक स्वत:च निवडतात,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी केले.

Loading...

‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’तील ‘पिफ फोरम’मध्ये ‘काँट्रीब्यूशन ऑफ अॅन अॅक्टर इन सिनेमा’ या विषयावर ऋषी कपूर यांच्याशी गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘पिफ’चे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी कपूर यांची मुलाखत घेतली.

‘मी एका प्रचंड लोकप्रियता असलेल्या वडिलांचा मुलगा आणि एका लोकप्रिय मुलाचा पिता आहे. मी एक लहान अभिनेता आहे. पण माझ्या रक्तात अभिनय आहे आणि माझे काम मी खूप मनापासून करतो,’ असे सांगत ऋषी कपूर यांनी अभिनयाविषयीचे आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘माझ्या मते ‘चांगला अभिनेता’ किंवा ‘वाईट अभिनेता’ असे काही नसते. अभिनेत्यांचे ‘अॅक्टर’ आणि ‘नॉन अॅक्टर’ एवढे दोनच प्रकार असतात. जो मुळात अभिनेता नाहीच तो केवळ ‘पोस्टमॅन’सारखे दिग्दर्शकाने सांगितलेले काम स्वत:चे काहीही न देता पडद्यावर दाखवतो. मला माझ्या कारकीर्दीची २५ वर्षे ख-या अर्थाने अभिनय करण्याची संधीच मिळाली नाही. ‘तुम जर्सी पहनो, गाना गाओ और स्वित्झरलँडमध्ये हिरोईनके पीछे भागो,’ असे मला सांगितले जायचे. आता माझ्या ‘सेकंड इनिंग’मध्ये मला चांगल्या भूमिका मिळू लागल्या आहे. त्यामुळे आता मी मजा घेऊन काम करतो.’’

वडील राज कपूर आणि आजोबा पृथ्वीराज कपूर यांचे हृद्य किस्से सांगत ऋषी कपूर यांनी त्यांच्या आठवणी उलगडल्या. ते म्हणाले, ‘‘माझे वडील राज कपूर हा मोठा माणूस आहे याची जाणीव आम्हा भावंडांना लहान वयातच झाली होती. ते सर्वार्थाने माझे गुरू आहेत. ‘बॉबी’ हा चित्रपट त्यांनी ठरवून मला चित्रपटांत ‘लाँच’ करण्यासाठी बनवला नाही. मी योगायोगाने त्या चित्रपटाचा भाग झालो. त्या वेळी मी अवघा २०-२२ वर्षांचा होतो. पडद्यावर गाणे म्हणण्याचा अभिनय कसा करतात हे मला अजिबात माहीत नव्हते. त्यापूर्वीच्या ‘मेरा नाम जोकर’मध्ये मी केवळ त्यांनी सांगितले तसे केले होते. ‘बॉबी’चे पहिले गाणे चित्रित झाले तेव्हा ‘नृत्यदिग्दर्शक कुठे आहे,’ अशी विचारणा मी त्यांना केली. तेव्हा ‘तू तुला येईल तसा अभिनय कर, स्वत:ची ओळख स्वत: तयार कर,’ असे उत्तर देत त्यांनी मला उडवून लावले. पण तो माझ्यासाठी एक धडा होता. पडद्यावर मी कधीही कुणाची नक्कल केली नाही.’’ शहनशाह अकबराच्या भूमिकेत आपण पृथ्वीराज कपूर यांच्याशिवाय कुणाचा विचारही करू शकत नाही, असेही ऋषी कपूर यांनी सागितले. राज कपूर यांच्या चित्रपटांचा ‘रीमेक’ करण्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘विशिष्ट जुन्या चित्रपटांची एक छबी लोकांच्या मनात असल्यामुळे त्यांना हात लावू नये,’ असे ते म्हणाले.

आज मराठी चित्रपट तिकीट खिडकीवर उत्तम कामगिरी करत असल्याचे सांगत ऋषी कपूर यांनी ‘सैराट’ या चित्रपटाचा विशेष उल्लेख केला. ‘मराठीतील नवीन लेखक आव्हाने स्वीकारून चांगले चित्रपट लिहीत आहेत, अनेक चांगले अभिनेते मराठीत आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी कौतुक व्यक्त केले.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...