शिवसेनेचा मंत्रिमंडळ विस्तारावर बहिष्कार की आमंत्रणच नाही ?

वेबटीम : मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षातील एकाही नेत्याचं नाव नसल्याचं समोर आल्यानंतर एन डी ए मधील प्रमुख घटकपक्ष शिवसेना नाराज झाली आहे .शिवसेनेने आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे .

नवीन मंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि जेडीयूला या मंत्रिमंडळ विस्तारात काहीच मिळणार नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळे या दोन्ही मित्र पक्षांचा हिरमोड झाला आहे. मित्रपक्षांच्या कोणत्याही नेत्याचा आज शपथविधी होणार नाही त्यामुळे शिवसेना नाराज झाली आहे. शिवसेनच्या बहिष्काराला भाजप सध्यातरी गांभीर्याने घेण्याच्या मूड मध्ये दिसत नाही.

या आधी देखील झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. सत्तेत राहून देखील शिवसेना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सातत्याने भाजपवर शरसंधान करत असते . सरकारच्या निर्णयांचा विरोधी पक्षांपेक्षा जास्त कडवट समाचार सामनामधून घेतला जातो.

एक काळ होता की जेव्हा मंत्रिमंडळाची यादी मातोश्री वरून जायची आणि त्याला भाजपला मान्यता द्यावी लागत असे . मात्र आता काळ बदलला असून स्वबळावर सत्ता उपभोगत असणाऱ्या भाजप शिवसेनेला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नाही. मोजकीच मंत्रिपद देऊन शिवसेनेची बोळवण करण्यात आली . आजच्या या बहिष्काराचा आगामी राजकारणावर काय परिणाम होतो हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.