नुकसानीची आकडेवारी नसल्याने पुरग्रस्तांच्या मदतीबाबत अंतिम निर्णय नाहीच; तात्काळ ‘एवढी’ मदत देणार

mahapur

मुंबई : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली होती. गेला आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तुफान पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत शेकडो जणांचा मृत्यू झाला. लाखो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे असंख्य कुटुंबांचं अतोनात नुकसान झालं आहे. आधीच कोरोनाने आर्थिक स्थिती बिघडली असताना २०१९ नंतर एकामागे एक येणाऱ्या संकटांच्या मालिकेमुळे पुराच्या पाण्याने उध्वस्त झालेला संसार कसा उभा करायचा ? असा गंभीर सवाल या पुरग्रस्तांसमोर निर्माण झाला आहे. यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर मदतीचा हात द्यावा अशी मागणी सर्वच लोकप्रतिनिधी करत आहेत.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत १०० टक्के मदतीबाबत अंतिम निर्णय होणार असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला होता. मात्र, अद्याप नुकसान भरपाईचे नेमके आकडे समोर न आल्याने अंतिम निर्णय होऊ शकला नाही. सध्या तात्काळ मदत म्हणून पूरग्रस्तांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर नुकसान प्रचंड झाले असल्याने काही नियम बदलून मदत दिली जाणार असल्याचे सांगण्यात येतंय.

महत्त्वाच्या बातम्या