अद्याप चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचे बोलावणे नाही – खा.संभाजीराजे

Sambhaji Raje Bhosale

महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये सुरू असणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्यातील खा उदयनराजे किंवा खा संभाजी राजे यांनी चर्चेला पुढे येण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. मात्र, अद्याप चर्चेसाठी कोणतेही बोलावणे आलं नसल्याचं खुद्द खा छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला.

मुख्यमंत्र्यांनी समन्वयकांची बैठक लवकरात लवकर बोलवावी. त्या बैठकीला मी नेता म्हणून नाही तर एक समन्वयक म्हणून उपस्थित राहील, असेही यावेळी खा संभाजीराजे यांनी सांगितले.

राज्यात आजवर 58 मूक मोर्चे निघाले, या मोर्चाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. पण तरीही समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आंदोलन होत आहे. मात्र आंदोलकांनी हिंसेच मार्ग न स्वीकारता शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.