कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज, रेल्वेच्या डब्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी आता भारतीय रेल्वेही पुढे आली आहे. भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भारतीय रेल्वेने आपल्या काही गाड्यांमध्ये विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. गरज पडल्यास या कक्षांमध्ये रुग्णांना दाखल करता येऊ शकेल. यासाठी या रेल्वे गाड्यांच्या कोचेसमध्ये काही तात्पुरते बदलही करण्यात आले आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

रेल्वेच्या शयनयान कोचेसमध्ये हे कक्ष तयार करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी केवळ एकच व्यक्ती राहू शकेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी वरच्या बर्थवर जाण्यासाठी असलेले शिडीही काढून टाकण्यात आली आहे. या कोचमध्ये असलेल्या बाथरूममध्येही बदल करण्यात आले आहेत. तिथे आंघोळीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

भारतात या आजाराचा तिसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये समूह संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अनेक जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. त्या स्थितीत रुग्णांचा आकडा वाढेल. म्हणूनच तयारीचा भाग म्हणून सर्व यंत्रणा सध्या सज्ज झाल्या आहेत. भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ८३४ वर जाऊन पोहोचली आहे.

दरम्यान, एका मुंबईकर नागरिकानेही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वेच्या डब्यांमध्ये तात्पुरते रुग्णालय सुरु करण्याची विनंती केली होती.” रेल्वे डब्यांमध्ये हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या बहुतेक सुविधा असतात. उदा. टॉयलेट, बेड इत्यादी जर काही रेल्वे डब्यांचं रूपांतर तात्पुरत्या रुग्णालयात केले तर कमी वेळात एक फार मोठी यंत्रणा सज्ज करता येईल आणि संपूर्ण देशभर कुठेही गरजेनुसार पाठवता येतील. रेल्वेचे डबे विलगिकरणासाठी पण उपयुक्त ठरतील. याकरिता रेल्वे उपयोगी ठरेल”, अशा आशयाचे पत्र किरण कुपेकर यांनी मोदींना पाठवले आहे.