आमचं सरकार कोरोनाग्रस्त रुग्णांना चांगली सेवा देत नाही असा खोटा प्रचार केला जातोय – राष्ट्रवादी

corona

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोना वाढला आहे आणि यात महाविकास आघाडी सरकार फेल गेले आहे असे चित्र भाजपाचे प्रवक्ते टीव्ही वाहिन्यांवर रंगवत आले आहेत. परंतु सात महिन्यात कोरोनातून साडे तेरा लाख लोकं बरे झाले आहेत. आरोग्य विभागाने आणि विशेषतः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाला आटोक्यात आणण्याची महत्वाची भूमिका बजावली गेली आहे. ही माहिती वारंवार देवूनही सरकारबद्दल नकारात्मक भूमिका मांडण्याचे काम भाजपाने केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

महेश तपासे यांनी भाजपकडून एसआयटी आणि कोरोना अंमलबजावणीवरुन महाविकास आघाडीवर होणाऱ्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले,३१ मार्च २०२० ला कोरोनाचा ग्रोथ रेट हा २७. २ होता. तो आजच्या तारखेला ०. ७४ टक्क्यांवर आला आहे. डबलिंग रेट ५ दिवसावर होता तो आता ९४ दिवसावर आला आहे. रिकव्हरी रेट साडे बारा टक्के होता तो आता ८४ टक्क्यांवर आला आहे.

टेस्ट चाचणी ही ६४ हजार दशलक्ष अशी करण्यात आली आहे. आमचं सरकार रुग्णांना सेवा देत नाही. भरमसाठ बिलं दिली जातात असा खोटा प्रचार केला जात आहे. कोरोना संपवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मेहनत घेतली आहे. ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’सारखी मोहीम राबवून सरकार कोरोनाचे उच्चाटन करण्यास सज्ज झाली आहे असे असताना सरकारला बदनाम करण्याचे काम भाजपाचे लोक करत असल्याचा आरोपही महेश तपासे यांनी केला.

यावेळी महेश तपासे यांनी आरोग्य खात्याकडून कोरोना काळात करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची आणि जनतेसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. महाराष्ट्र हा १०० टक्के कोरोनामुक्त होईल परंतु त्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी सरकार वेळोवेळी सूचना आणि माहिती देत आहे त्याचे पालन करावे असे आवाहनही महेश तपासे यांनी केले.

जलयुक्त शिवार योजनेवर एसआयटीची चौकशी लावली ही सुबुद्धीने नाही तर कॅग’च्या अहवालानुसार नेमण्यात आली असून भाजपाने खोटारडेपणा करु नये अशी माहिती देखील तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपाची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना आणली. या योजनेमुळे महाराष्ट्रातील मोठा भाग टॅकरमुक्त होईल असे मोठे दावे केले होते. यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरातबाजी केली मात्र कॅगने या योजनेवर ताशेरे मारल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

या योजनेत एकूण २२ हजार ५६८ गावे व ६ लाख कामांचा समावेश होता आणि त्यासाठी ९ हजार ६३४ कोटी रुपये खर्च झाला आहे. ज्याप्रमाणे सांगण्यात आले होते तेवढी भूजल पातळी वाढली नाही. उलट टँकरमुक्त होण्याऐवजी टँकरची संख्या वाढल्याचे समोर आले. या सगळ्या प्रकरणाचे सत्य बाहेर आले पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे कॅगने मारलेल्या ताशेरे यावर ही एसआयटी नेमण्यात आल्याचे तपासे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या:-