fbpx

भाजपचे सरकार आल्यापासून राज्यात दलित अत्याचारात प्रचंड वाढ

Dalit Boys Beaten, Paraded Nude For Swimming In Well In Maharashtra 2

मुंबई- विहीरीत पोहले म्हणून मातंग समाजाच्या मुलांना नग्न करून मारहाण करणे व त्याचा व्हिडीओ बनवणे ही फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. भाजपचे सरकार आल्यापासून देशात आणि राज्यात वारंवार अशा घटना घडत आहेत. भाजपची दलित विरोधी मनुवादी विचारधारा याला कारणीभूत आहे अशी घणाघाती टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

देशात भाजपचे सरकार आल्यापासून दलित अल्पसंख्यांक आणि आदिवासींवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. ऊना येथील दलितांवरील अत्याचार, रोहित वेमुला प्रकरण तसेच घोड्यावर बसले म्हणून मारहाण, मिशा वाढवल्या म्हणून मारहाण असे अत्यंत घृणास्पद प्रकार घडले आहेत. पण सरकार या प्रकारांतील दोषींवर कारवाई करीत नाही हे दुर्देव आहे. अनेक वर्ष काँग्रेसच्या विविध सरकारांनी देशातील जातीयवाद संपवण्यासाठी प्रयत्न केले परंतु गेल्या चार वर्षात देशाला मागे घेऊन जाण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. त्यांच्या मनुवादी विचारधारेचे भयंकर दुष्परिणाम सामाजिक सलोख्यावर होत आहेत.

माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे पथक जळगाव जिल्ह्यातील जामवाकडी ता. जामनेर गावी तात्काळ जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहे तसेच पोलीस अधिका-यांना भेटून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे. या पथकात माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, माजी खा. व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, माजी आ. शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील यांचा समावेश असेल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिली.