‘तालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत बरेच साम्य’; जावेद अख्तर यांचं मोठं भाष्य

javed akhat

मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तालिबान विषयी आपले मत व्यक्त करताना जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल या संघटनांवर देखील टीका केली होती. तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदनीय आहे. भारतात आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान सारखेच आहेत असं म्हटलं होतं. दरम्यान, जावेद अख्तर यांनी आपलं मौन सोडलं असून पुन्हा एकदा परखड मत मांडलं आहे.

याविषयी जावेद अख्तर  यांनी  सामनामध्ये लेख लिहून याविषयी आपलं परखड मतं मांडलं आहे. जावेद अख्तर यांनी या लेखात असं म्हंटल आहे कि,  3 सप्टेंबर 2021 रोजी ‘एनडीटीव्ही’ वाहिनीला मुलाखत दिली तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती की, या मुलाखतीचे इतके तीव्र पडसाद उमटतील. एका बाजूला असे काही लोक आहेत ज्यांनी शक्य तितक्या तीव्र भाषेत त्यांचा निषेध आणि संताप व्यक्त केला आहे, त्याच उपरोल्लेखित मुलाखतीचा तिरस्कार करणाऱ्यांच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर द्यायचे आहे. प्रत्येक टीकाकाराला वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य नसल्यामुळे हे माझे जाहीर उत्तर आहे,’ असं जावेद अख्तर यांनी स्पष्ट केलं आहे.

“तालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत मला बरेच साम्य आढळते, याचादेखील माझ्या टीकाकारांना प्रचंड राग आला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांच्यात खरंच खूप साम्य आहे. तालिबान धर्मावर आधारित इस्लामिक सरकार स्थापन करत आहे. हिंदू उजव्या विचारसरणीला हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे. तालिबानला स्त्रीयांच्या हक्कांवर निर्बंध घालायचे आहेत आणि त्यांना उपेक्षित ठेवायचे आहे. हिंदू उजव्या विचारसरणीलाही स्त्रीया आणि मुलींना स्वातंत्र्य दिलेले आवडत नाही, हे स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेश, गुजरातपासून कर्नाटकपर्यंत अनेक राज्यांत रेस्टॉरंट, बागेत किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसल्यामुळे तरुण-तरुणींना निर्दयपणे मारहाण करण्यात आली आहे. मुस्लिम धर्मांधांप्रमाणेच हिंदू उजव्या विचारसरणीलाही स्त्रियांचा स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार मान्य नाही. अलीकडेच एका अत्यंत महत्त्वाच्या उजव्या विचारसरणीच्या नेत्याने म्हटले आहे की, स्त्रिया स्वतःच्या मर्जीने आणि स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम नाहीत. तालिबानप्रमाणेच हिंदू उजवी विचारसरणीही कोणत्याही मानवनिर्मित कायदा किंवा न्यायालयापेक्षा धर्म आणि आस्था या गोष्टी श्रेष्ठ असल्याचा दावा करते,” असं सांगत जावेद अख्तर यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

“तालिबानला कोणतेही अल्पसंख्याक समुदाय अजिबात आवडत नाहीत; त्याचप्रमाणे हिंदू उजव्या विचारसरणीनेही अल्पसंख्याकांबद्दल त्यांच्या मनात कोणत्या प्रकारचे विचार आणि भावना आहेत हे वेळोवेळी त्यांच्या भाषणांमधून आणि घोषणांमधून आणि जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा त्यांच्या कृत्यांमधून स्पष्ट केले आहे. तालिबान आणि या कट्टर गटांमध्ये फरक एवढाच आहे की, तालिबानकडे आज अफगाणिस्तानात अनिर्बंध सत्ता आहे आणि त्यांना प्रश्न विचारणारे तिथे कोणीही नाही तर हिंदुस्थानात मात्र हिंदुस्थानी संविधानाशी पूर्णपणे विसंगत असणाऱ्या तालिबानी विचारसरणीच्या या हिंदुस्थानी आवृत्तीला मोठय़ा प्रमाणात विरोध आहे. आपले संविधान धर्म, समुदाय, जात पिंवा लिंग या आधारावर भेदभाव करीत नाही. आपल्याकडे न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमांसारख्या संस्थाही आहेत. या दोघांमधील फरकाचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तालिबानने अफगाणिस्तानात स्वतःचे लक्ष्य आता साध्य केले आहे. हिंदू उजवी विचारसरणीदेखील हिंदुस्थानात तशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. सुदैवाने हा हिंदुस्थान देश आहे आणि असे काही हिंदुस्थानी लोक आहेत जे याला कडवा प्रतिकार करीत आहेत,” असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

जावेद अख्तर यांनी या लेखात असंही म्हंटलं आहे की, “होय, या मुलाखतीत मी संघ परिवारातील काही संघटनांसंदर्भात माझे आक्षेप व्यक्त केले आहेत. धर्म, जात आणि पंथाच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या कोणत्याही विचारसरणीला माझा विरोध आहे आणि अशा प्रकारच्या कोणत्याही भेदभावाच्या विरोधात असलेल्या सर्वांच्या पाठीशी मी उभा राहिलो आहे. कदाचित म्हणूनच 2018 मध्ये हिंदुस्थानातील सर्वात आदरणीय मंदिरांपैकी एक असलेल्या वाराणसीच्या ‘संकटमोचन मंदिरा’ने मला आमंत्रित केले आणि त्याहूनही अभूतपूर्व म्हणजे, मला ‘शांतिदूत’ अशी उपाधी आणि ट्रॉफी देण्यात आली. मंदिराच्या आत भाषण देण्याचीही मला संधी देण्यात आली. माझ्यासारख्या नास्तिकासाठी हा अत्यंत दुर्मिळ सन्मान आहे,’ असं लिहीत जावेद अख्तर यांनी टीकाकारांना चोख उत्तर दिल आहे.

महत्त्वाच्या बातम्या