देशातील आमदार, खासदारांवर तब्बल ३ हजार ८१६ खटले

खुद्द केंद्र सरकारनेच दिली सर्वोच्च न्यायालयात माहिती

नवी दिल्ली: देशातील खासदार आणि आमदारांवर तब्बल ३ हजार ८१६ खटले दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द केंद्र सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात हि माहिती दिली आहे.

देशभरातील १ हजार ७६५ आमदार, खासदारांवर तब्बल ३ हजार ८१६ खटले दाखल असून त्यातील ३ हजार ४५ खटले प्रलंबित आहेत. ही माहिती खुद्द केंद्र सरकारनेच सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांतील खटल्याच्या आकडेवारीचा समावेश नाही.

भाजप नेते ऍड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी गुन्ह्य़ात दोषी ठरलेल्या राजकीय नेत्यांना निवडणुका लढवण्यास कायमची बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावरून आमदार-खासदारांवरील खटल्यांचा तपशील सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती रंजन गोगाई यांच्या अधिपत्याखालील द्विसदस्यीय खंडपीठाने १ नोव्हेंबर २०१७ रोजी दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारने एका प्रतिज्ञापत्राद्वारे आमदार, खासदारांवरील खटल्यांची आकडेवारी सर्वोच्च न्यायालयाला सादर केली आहे. केंद्र सरकारने दिलेली आमदार, खासदारांवरील गुन्हय़ांची आकडेवारी ही २३ उच्च न्यायालयांतील आहे.