सांगली: राज्यसरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीचा (Wine Sale) प्रस्ताव मंजूर केला. या निर्णयानुसार वाईन आता जनरल स्टोअर तसेच सुपर मार्केटमध्ये देखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. राज्यसरकारच्या या निर्णयावर भाजप आक्रमक झाले आहे. भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर यावरुन टीका केली आहे. भाजपनंतर आता सांभाजी भिडे यांनी देखील ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.
संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले, जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा एकसुद्धा मंत्री, आमदार असा निर्णय करणार असेल तर मी आमदारकीवर, मंत्रीपदावर थुंकतो, तुमच्यात बसण्याचं पाप मी करणार नाही, असं म्हणून बाहेर पडला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धान्य कुजवून त्याच्यापासून दारू तयार करा असं सांगणारी मंडळी आम्हाला पूज्य असतात. आम्हाला राग येत नाही, संताप येत नाही, असं संभाजी भिडे म्हणाले. सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना भिडे म्हणाले, एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने, एक पाऊल प्रगतीच्या दिशेने. पण हे पहिलं पाऊल सर्वनाशाच्या दिशेने पडलेलं आहे. या देशातली दारू संपली पाहिजे शंभर टक्के. आपण दारूचा जर अशा पद्धतीने मुक्तसंचार होऊ देत असू, तर गांजाची शेती करण्याला आपण का आडवं जायचं? सर्रासपणे अफू, गांजाची शेती करून आपला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापारातून पैसा मिळवू शकेल. हेसुद्धा करायला हरकत नाही असं म्हणणारा बेशरम समाज निर्माण होतोय. पण ते जमणार नाही. त्याच्याविरोधात आम्ही उभे राहणार आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
भय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी
पीटरसनने पंतप्रधान मोदींच्या पत्राला दिले हिंदीत उत्तर! म्हणाला, “आदरणीय मोदीजी, मुझे…”
वाईनच्या निर्णयावरून भाजपनंतर आता संभाजी भिडे आक्रमक, म्हणाले हे सरकार…